नाशिक – विश्वासाचे नाते म्हणुन पती-पत्नीच्या नात्याकडे पाहिले जाते. परंतु, या नात्याला काळीमा फासणारा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. गुंगीचे औषध देवून वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात एकाने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीला डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अश्लिल चित्रफिती आणि छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत भामट्यांनी हे कृत्य केले.
मागील तीन वर्षापासून पतीकडून सुरू असलेला अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने अखेर पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अपहरणासह खंडणीसाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेस्थित २५ वर्षीय विवाहितेने पोलिसांकडे आपली व्यथा मांडली. महिला संशयितांमधील एकाची पत्नी असून, लग्नानंतर पतीसमवेत नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी भागात वास्तव्यास होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी पतीला मदत व्हावी यासाठी ती काहीतरी खटपट करत होती. मात्र ही बाजू सुधारण्यासाठी संशयिताने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीला डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले.
संशयित पतीने पैश्यांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये पत्नीसमोर बेकायदा व्यवसाय करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र पत्नीने प्रस्ताव फेटाळल्याने तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला. तिला अवैध व्यवसायात ढकलण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता.
अखेर तिला या व्यवसायात ढकलण्यासाठी तिच्यावर गुंगीकारक औषधाचा वापर करण्यात आला. मित्राच्या मदतीने बळजबरीने अपहरण करून पत्नीस बंगळुरु आणि सोलापूर येथे नेण्यात आले. पत्नीने बेकायदा व्यवसायास होकार द्यावा, यासाठी तिची अश्लिल छायाचित्रे आणि चित्रफिती काढण्यात आल्या. पीडितेने या कृत्यास नकार दिल्याने नराधम पतीने मित्राच्या मदतीने शिवीगाळ करीत मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता संशयितानी पीडितेची काढलेली छायाचित्रे, चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत ठाण्यातील डान्स बारमध्ये नाचण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही तक्रार कौटूंबिक वादातून देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असून सदर महिलेबाबत पंचवटी पोलिसात काही दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याबाबत फिर्याद देण्यात आली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली.