नाशिक – जिल्हा परिषदेच्या गट, गण आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांच्या राजकीय महत्वाकांक्षेला धक्का बसला. काहींची वाटचाल सुकर झाली. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे अशा काहींचे गट अन्य प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शितल सांगळे यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली. दिंडोरी तालुक्यात सर्व गट एसटीसाठी राखीव झाल्याने अनेकांची अडचण झाली. देवळा तालुक्यात तीन गट सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने माजी सभापती केदा आहेर यांच्यासह काहींना संधी मिळू शकते.
जवळपास साडे तीन वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची इच्छुकांना प्रतिक्षा आहे. सोमवारी गट, गट आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींचा हिरमोड झाला तर, काहींनी मनासारखे आरक्षण निघाल्याने जल्लोष केला. काही दिग्गजांना कुटुंबांतील महिलांना संधी द्यावी लागणार आहे. गट आरक्षित झाल्याचे लक्षात येताच काहींनी सभागृहातून निघून जाणे पसंत केले. कालिदास कलामंदिरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत निघाल्यानंतर असे वातावरण पहायला मिळाले. ७४ गटांसाठी निघालेल्या सोडतीत ३७ गट हे महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जाती (एससी) तीन, अनुसूचित जमाती (एसटी)१५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) १० तर, सर्वसाधारण नऊ जागांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा दिंडोरीतील सर्व गट एसटी राखीव झाल्याने भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी सभापती सुनिता चारोस्कर, धनराज महाले, वैभव महाले तसेच मंत्री नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांना रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे. येवला तालुक्यात माजी सभापती सुरेखा दराडे यांच्यासह दराडे कुटुंबियांची संधी राखीव गटाने रोखली गेली. कुणाल दराडे यांना नवीन गट शोधावा लागणार आहे. सुरगाणा तालुक्यात एकमेव गट एसटी पुरूष राखीव असल्याने तिथे इच्छुकांची गर्दी पहायला मिळणार आहे. सिन्नर तालुक्यातील दोन गट महिलांसाठी तर चार गट खुले झाले. त्यामुळे सीमंतिनी कोकाटे, भारत कोकाटे यांचा मार्ग मोकळा झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे यांचा दापूर गट महिला राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे. निफाड तालुक्यातून माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते आदींचे गट महिला राखीव झाल्याने जिल्हा परिषदेत येण्याची त्यांची संधी हुकली. संबंधितांकडून कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. चांदवड तालुक्यात तळेगावरोही गट महिलांसाठी राखीव झाल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार शिरीत कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल यांची संधी हुकली. दुगाव गट एसी राखीव झाल्याने माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांना पाच वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.
बहुप्रतिक्षित जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे अशा प्रस्थापितांना आपल्या घरातील महिलांना पुढे आणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु, त्यातही काही जण भाग्यशाली ठरले आहेत. त्यांचे गट त्यांना अनुकूल असेच आरक्षित झाले आहेत.