नाशिक – राजकीय पक्षांमधील घराणेशाही हा विषय कायमच चर्चेत असतो. घराणेशाहीला थारा नको, इतर सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, अशी अपेक्षा राजकीय पक्षांमधील प्रस्थापित मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी व्यक्त करीत असले तरी निवडणुकांमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसते. आपल्याच घरातील सदस्यांना कशी संधी मिळेल, तेच पाहिले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसमधील घराणेशाहीवर कायमच टीका करतात. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नसल्याचा दावा करतात. परंतु, भाजपमध्येही घराणेशाही असल्याची अनेक उदाहरणे आहेत. इतर पक्षांमध्येही अशी उदाहरणे आहेत. त्यात गुरुवारी अजून एका घराण्याची भर पडली.
राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांची मुलगी सिमंतिनी कोकाटे या नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या देवपूर गटातून जिल्हा परिषद सदस्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्या पुन्हा तयारीत आहेत. दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी नाशिक येथे भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. २०२२ मध्ये भारत कोकाटे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता.
परंतु, ठाकरे गट विरोधी पक्षात असल्याने भारत कोकाटे यांनी सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भारत कोकाटे यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सिन्नरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रवेश सोहळ्यात भारत कोकाटे यांनी, आपली कोणावरही नाराजी नसल्याचे सांगितले. चार ते पाच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत काम केले. पंरतु, कार्यकर्त्यांना पाहिजे तसा न्याय देता येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षश्रेष्ठी जे सांगतील ते काम करण्यास तयार आहे.
माणिकराव कोकाटे हे माझे बंधू असून त्यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक चांगले संबंध आहेत. बंधू माणिकरावांनी ज्याप्रमाणे राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले, त्याप्रमाणे स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असून, निवडून आल्यास जनतेची कामे करण्यास प्राधान्य देईल, असे भारत कोकाटे यांनी नमूद केले.
भारत कोकाटे यांचा राजकीय प्रवास वेगवान राहिला आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन, सोमठाणे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक या महत्त्वाच्या पदांवर काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्यासारखा युवा मातब्बर पक्षात आल्याने भाजपला सिन्नर तालुक्यात मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. भारत कोकाटे यांच्या प्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष सुनील केदार आदी उपस्थित होते.