जळगाव – गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. सर्व पाणी तापी नदीत आणि पुढे समुद्राला जाऊन मिळत असताना, अपव्यय टाळण्यासाठी ते कालव्यात सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाचा मोठा खंड पडल्याने कोरड्या दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी तातडीने गिरणा धरणाचे एक आवर्तन सोडण्याची मागणी शरद पवार गटाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
प्रत्यक्षात, त्यानंतर पावसाचे आगमन झाले असले तरी भूजल पातळी वाढविण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यासंदर्भात शरद पवार गटाने पाठपुरावा सुरूच ठेवला. शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले तसेच कार्यकारी अभियंता (गिरणा) विनोद पाटील यांची पुन्हा भेट घेतली. परंतु, बऱ्याच ठिकाणी कालव्याची दुरुस्ती सुरू आहे आणि लवकरच पाणी सोडण्यात येईल, असे अभियंत्यांकडून सांगण्यात आले.
शिष्टमंडळाने त्यानंतर पुन्हा एक सप्टेंबरला पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली. तेव्हा पाणी सोडण्याच्या संदर्भातील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा विषय मार्गी लागला. तसेच शिष्टमंडळ पाच सप्टेंबरला पुन्हा भेट घेण्यासाठी आले असता, कार्यालयीन सुट्टी असल्याने अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, भ्रमणध्वनीवर बोलणे झाले. धरणातील पाणी वाया जाण्यापेक्षा कालव्यात सोडले तर शेतकऱ्यांना थेट लाभ होईल, असे शिष्टमंडळाने तळमळीने सांगितले.
त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना आदेशित करून पावसामुळे रखडलेल्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यास सांगितले. उपविभागीय अभियंता तुषार राजपूत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही दुरूस्तीच्या कामाला लगेच सुरूवात करून सर्व कागदोपत्री प्रकिया पूर्ण केली जाईल. तसेच कालव्यात १२ सप्टेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल, अशी ग्वाही दिली.
संबंधित विभागाच्या अभियंता वर्गाकडून सुरू असलेली टोलवाटोलवी लक्षात घेता, १२ सप्टेंबरपर्यंत कालव्यात पाणी सोडले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला. यावेळी पक्षाच्या माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, महिला तालुकाध्यक्षा आशा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. विलास चव्हाण, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी सरपंच उज्ज्वल पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, कंत्राटदार मोहीत पवार, धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, व्यावसायिक नितीन पाटील, गोपाल पाटील, भगवान शिंदे, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, कार्याध्यक्ष साईनाथ पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.