जळगाव : राजकारणात नसेपर्यंत मी दहशतवादी अजमल कसाब विरोधात लढणारा योद्धा होतो. परंतु, राजकारणात आलो आणि टीकाकारांच्या नजरेत वाईट झालो. कामठे, साळस्कर यांच्यावर संघाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच गोळीबार केल्याचा आरोप झाला. त्यावरून माझ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. राजकारणात आल्यानंतरच मी अचानक कसा वाईट झालो ?, अशी खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी येथे व्यक्त केली.

राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ॲड.निकम यांचे रविवारी जळगावमध्ये आगमन झाले. त्यानिमित्त त्यांचा नागरी सत्कार छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ॲड.निकम यांनी आज राज्यसभेचा खासदार झालो असलो, तरी मी पांढरे कपडे परिधान केलेले नाहीत. माझ्या अंगावरील कोट अजुनही कायम आहे. कारण, मी राजकारणी झालो असलो तरी माझी भूमिका अजिबात विसरलेलो नाही. माझ्या मूळ भूमिकेपासून मी कधीच लांब जाणार नाही. राजकारणासोबत माझा वकीली व्यवसाय सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आई विमलादेवी यांच्याकडून मला देशसेवेचे बाळकडू मिळाले होते. त्याचे पालन मी आयुष्यभर करत राहणार असल्याचेही ॲड.निकम यांनी नमूद केले. सरकारी वकील म्हणून जळगावमध्ये आयुष्याची सुरूवात केली होती. त्यानंतर देशभर गाजलेला मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविला. राज्यभर मोठे नाव झाले. त्यानंतरही मी जळगावशी जुडलेली नाळ कधी तुटू दिली नाही. त्यामुळेच आज माझा नव्हे तर समस्त जळगावकरांचा सत्कार होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यसभेत मातृभाषा मराठी शपथ घेतल्यानंतर सर्वांनी माझी व्यक्तिशः भेट घेऊन अभिनंदन केले. त्या सर्वांच्या अपेक्षांची पूर्ती मला करायची आहे, असेही त्यांनी म्हटले.

राजकारण्यांशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. तरीही माझी स्वतःची राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. मात्र, अमित शहांचा निरोप आला आणि मी भाजपकडून मुंबईत लोकसभेची निवडणूक लढली. निवडणूक लढल्यावर तुम्ही संघाचे तसेच भाजपचे कार्यकर्ते आहात का ?, इतर पक्ष सोडून भाजपमध्येच का गेलात ?, असे मला माध्यमांकडून त्यावेळी विचारण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण मला एक सांगा संघात काय वाईट आहे ?, असा प्रश्न ॲड.निकम यांनी उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावळ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते. सत्कार समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रास्ताविक केले.