नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ-कुंभमेळ्यात केवळ हिंदुंची दुकाने हवीत. हिंदू धर्मियांसह स्थानिकांनी सतर्कता बाळगून सर्वत्र केवळ हिंदू धर्मियांची दुकाने लागलील, दुसऱ्या कुणाला जागा दिली जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेले भाजपचे मंत्री राणे यांच्या उपस्थितीत विविध बैठका पार पडल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला मतदार याद्यांतील कथित घोळ, मालेगावमधील काही शाळांकडून वंदे मातरमच्या आदेशाकडे झालेले दुर्लक्ष, आगामी कुंभमेळा आदींवर भाष्य केले. मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाकडून कुंभमेळ्याची मोठी तयारी सुरू आहे.
कुंभमेळ्याला सुरुवात झाल्यावर सर्वत्र केवळ हिंदुंची दुकाने लागली पाहिजेत, अशी आपली मागणी आहे. या ठिकाणी गोल टोपी आणि दाढीवाले कशाला हवेत, असा प्रश्न त्यांनी केला. मुळात कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचा उत्सव आहे. कुंभमेळ्यात हिंदुंचीच दुकाने असायला हवीत. अन्य कोणी फिरकताही कामा नये. या काळात दुकानाबाहेर नाव बदलून आतमध्ये भलतीच व्यक्ती बसलेली असेल.
त्र्यंबकेश्वर शहरात इतरांची काही दुकाने दिसतात. तिथे त्यांचे काय काम, आम्ही अन्य धर्मिय प्रार्थनास्थळाजवळ काही विकायला जातो का, असे प्रश्न मंत्री राणे यांनी केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदू समाज, साधू-संतांनी सतर्क राहावे, असे त्यांनी सूचित केले.
विरोधी पक्ष आणि ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेल्या मतदार याद्यांमधील कधित घोळाच्या मुद्यावर मंत्री राणे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला नसल्याचे नमूद केले. विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाने बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान केले. तेव्हा विरोधकांना झोंबायला लागले.
एका व्यक्तीने बुरखा घालून १४ वेळा मतदान केले. एका मोहल्ल्यातून एवढे मतदान कसे झाले, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी इतका व्होट जिहाद कसा होतोय हे विचारले नाही, अशी टीका मंत्री राणे यांनी केली. विरोधक आता केवळ हिंदू धर्मियांना लक्ष्य करीत आहेत. ठाकरे बंधूंनी मोहमंद अली रोड भागात, मालेगावमध्ये मतदार याद्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विशिष्ट नावे दुबार, चौबार कशी, हे विचारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान मंत्री राणे यांनी दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ती हिंमत होती, असेही त्यांनी नमूद केले.
