जळगाव : जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने सुमारे दोन लाख ४७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन तीन लाख २५ हजार ३९ शेतकरी बाधित झाले. संबंधितांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने ३०० कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात दिवाळी उलटूनही ७० हजारांवर शेतकऱ्यांना कोणतीच आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.
जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळीसह कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती. प्रत्यक्षात, जिल्ह्यासाठी दिवाळीच्या दोन दिवस आधी सुमारे २९९ कोटी ९४ लाख ४६ हजार रूपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली. त्याचे वितरण दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयांकडून केले जाणार असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात, ई केवायसीच्या नावाखाली शुक्रवारअखेर एक लाख ६९ हजार ५४३ शेतकऱ्यांनाच १४७ कोटी ७२ लाख ९६ हजारांचे अनुदान वितरीत झाले आहे. ई केवायसी न झालेल्या सुमारे ७० हजार ७९३ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ६० कोटी ८० लाख ८७ हजार रूपयांचे पीक नुकसान अनुदान मिळालेले नाही.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीत एकूण सुमारे दोन लाख ८३ हजार ३२९ हेक्टरवरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होऊन तीन लाख ८२ हजार ४२५ शेतकरी बाधित झाले आहेत. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार, आतापर्यंत सुमारे ३५२ कोटी ७१ लाख ४० हजार रूपयांची मदत मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात, आजतागायत एक लाख ८८ हजार ६७२ शेतकऱ्यांना १६२ कोटी ३७ लाख ७३ हजार रूपयांची मदत वितरीत झाली आहे. ई केवायसी न झालेल्या ९० हजार ४३८ शेतकऱ्यांना कोणतीच मदत अजुनही मिळालेली नाही.
ई केवायसी करण्याचे आवाहन
जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून, तालुकास्तरावरुन त्याचे वाटप केले जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी पोर्टल देखील पाच नोव्हेंबरापासून कार्यान्वित झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.
