नाशिक- समृध्दी महामार्ग रस्त्यालगतचे दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निष्कामी जिलेटीनच्या कांड्या भंगारात दिल्या गेल्या. परंतु, त्यांची निष्काळजीपणे विल्हेवाट लावण्यात आल्याने मुंबई नाका पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदीकाठी रविवारी तीन गोण्यांमध्ये निकामी झालेल्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. सण उत्सवाच्या काळात स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने मुंबई नाका पोलिसांनी बाॅम्बशोधक आणि श्वान पथकाव्दारे त्या कांड्यांची तपासणी केली असता त्या निष्क्रिय असल्याचे आढळून आले होते. परंतु, या कांड्या नंदिनी नदीकाठी कोणी आणून टाकल्या, याविषयी पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली. सीसीटीव्हीतील चित्रणांची पाहणी केली असता घटनास्थळी ये-जा करण्याच्या मार्गावर एक मालवाहू वाहन येताना आणि जातांना दिसले.
पोलिसांनी त्यानुसार भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार याची सखोल चौकशी केली. त्याने मालाची विल्हेवाट लावण्यासाठी भाडे दिले होते. मात्र रिझान शेख आणि कामगार दबीर अन्सारी यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळील नंदिनी नदीच्या किनारी निकामी झालेल्या जिलेटीनच्या गोण्या टाकल्या. कसारा परिसरातील साल्वो एक्स्प्लोसिव्ह ॲण्ड केमिकल प्रा. लि. या कंपनीकडून त्याने भंगारात खराब झालेल्या मालमोटारीचा काही भाग अशोक कर्डक यांच्याकडून खरेदी केला. त्यात एका ठिकाणचे कुलूप तोडल्यावर जिलेटीनच्या कांड्या आढळल्या. त्याची विल्हेवाट लावण्यास अत्तार यांनी सांगितल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण काय?
गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना भाभानगर येथील गायकवाड सभागृह परिसरात नंदिनी नदीकिनारी रविवारी दुपारी तीन गोणी आढळून आल्या. या गोणींमध्ये संशयास्पद कांड्या असल्याने स्थानिकांनी मुंबईनाका पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गोणींमध्ये स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाला बोलावले.
या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना काम करतांना गर्दीलाही आवरावे लागले. गोण्यांची श्वान आणि बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी करण्यात आली असता प्रथमदर्शनी व्यावसायीक कामासाठी जिलेटीन कांड्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाले. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली