जळगाव : शहरातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या उद्देशावरून हल्ला करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पदाधिकाऱ्याविरोधात तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा संबंधिताला अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या तक्रारीनुसार, जळगाव शहरातील त्यांच्या कार्यालयावर ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अचानक हल्ला करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी संशयितांकडून वाणी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या आरोपांच्या आधारे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही देशमुख यांना अटक करण्याची कार्यवाही पूर्ण झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
दरम्यान, व्यावसायिक वाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. राजकीय दबावातून संबंधित पदाधिकाऱ्याला अटक केली जात नसल्याचे गंभीर आरोप जिल्हा पोलीस प्रशासनावर केले होते. तत्पूर्वी, वाणी यांनी पोलीस अधीक्षकांसह रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना लेखी अर्ज दिले. संबंधित पदाधिकाऱ्याला गुन्हा दाखल असल्यावर देखील अटक का करत नाही म्हणून बऱ्याच वेळा विचारणा केली. मात्र, प्रत्येक वेळी मला तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या. वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याने आम्ही संबंधितावर काहीच कारवाई करू शकत नाही, असे उत्तर त्यांना मिळाले.
माझ्यावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तत्काळ अटक करून दोषारोप दाखल केले. मात्र, समोरच्या पदाधिकाऱ्यावरील दरोड्यासह फसवणूक, लैंगिक अत्याचार, कट कारस्थान यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केली. संबंधित पदाधिकाऱ्याचा जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळला. तरीही त्यांना अटक झाली नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने २८ एप्रिल २०२५ रोजी संबंधिताला अटक करण्याचे आदेश दिले.
प्रत्यक्षात, अजितदादांचा कोणतीच कारवाई करू नका म्हणून आम्हाला फोन येऊन गेल्याचे पोलिसांकडून मला दबक्या आवाजात सांगण्यात आले, असा गौप्यस्फोटही वाणी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच आठवडाभरात न्याय न मिळाल्यास मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर मुंबईत उपोषणाला बसेल, असा इशारा दिला होता. अखेर, मंगळवारी रात्री विनोद देशमुख यांच्यावर रामानंदनगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यांना आता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
