नंदुरबार – वारंवार दंगे होणारा जिल्हा ही नंदुरबारची ओळख पुसून काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नंदुरबारमध्ये अशांततेला कारण ठरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने तीन महिन्यात तब्बल २९२० जणांविरुध्द विविध गुन्ह्यांअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष म्हणजे यातील ११२ जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १६३ अन्वये कारवाई करण्यात आल्याने त्यांना गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिरवणूकीत सहभागी होता येणार नाही.

किरकोळ कारणावरुन दंगे भडकणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची झालेली कूप्रसिध्दी खोडून काढण्यासाठी आणि यंदाची गणेश उत्सव विसर्जन आणि ईदची मिरवणूक शांततेमध्ये साजरी होण्यासाठी नंदुरबार पोलीस दलाने कंबर कसली आहे. यंदा नंदुरबार पोलीस दलाने यासंदर्भात जूनपासून ते ऑगस्ट अखेरपर्यत २९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात २२२३ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या १२६ नुसार , २९ जणांवर कलम १२८ नुसार, ३२५ जणांवर कलम १२९ तर ११२ जणांवर बीएनएल कलम १६३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. यात ११२ जणांना गणेश विसर्जन आणि ईदच्या मिरवणूकीत सहभागास प्रतिबंध करुन त्यांना शहराबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ अन्वये चार, तर याच कायद्यातील कलम ५६ अन्वये १० जणांवर तर कायदा क्रमांक ५७ अन्वये तीन जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.कायदा क्रमांक १२२ अन्वये २७, कायदा क्रमांक १२४ अन्वये १६, महाराष्ट्र प्रोव्हि. कायदा ९३ अन्वये १७० तर एमपीडीए अंतर्गत एकाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. तीनच महिन्यातील या सर्व कारवायाचा आकडा हा २९२० वर गेल्याने गु्न्हेगार आणि समाजकंटकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

यंदा प्रथमच पोलिसांनी गणेश विसर्जन मार्ग आणि ईदच्या मिरवणूक मार्गावर ५० सीसीटीव्ही कार्यान्वित केले आहे. शहरातील सामाजिक दायीत्वातून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही व्यतिरीक्त हे कॅमेरे उपद्रव्यांवर नजर ठेवून असून त्यांचा आवाज देखील टिपण्याची सुविधा या सीसीटीव्ही कॅमऱ्यांमध्ये आहे. सायबर सेल हे समाज माध्यमातून भडकावू, चुकीचे, दोन गटात तेढ निर्माण होणाऱ्या संदेशांवर करडी नजर ठेवून आहे. नंदुरबार शहराबरोबरच शहादा शहरात देखील अशाच पद्धतीने सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहीती पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी दिली आहे.

प्रत्येक सणावेळी आणि इतर वेळीही पोलिसांनी अशी दक्षता घेतल्यास नंदुरबारमधील दंगे हे कायमचे बंद होतील, असा आशावाद नागरिकांकडून करण्यात येत आहे. धार्मिक आणि दोन समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणी भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.