जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि बरीच महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांना तीन चोरट्यांची ओळख पटली असून, त्यांची नावे सुद्धा निष्पन्न झाली आहेत.
जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालय परिसरातील शिवरामनगर येथे असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात दिवाळीच्या काळात ही चोरीची घटना घडली. एरवी खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील त्यांचा बंगला तसा रिकामाच असतो. बंगल्याच्या देखभालीसाठी ठेवण्यात आलेला केअर टेकर त्यामुळे थोडा निवांत होता. तीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रेकी करून सोमवारी रात्रीच्या वेळी खडसेंच्या बंगल्यात प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या खोल्यांतील कपाटे उघडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. तसेच अंदाजे ६७ ग्रॅम सोने, साडेसात किलो चांदी आणि सुमारे ३५ हजार रुपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही महत्वाची कागदपत्रे, असा ऐवज चोरून नेली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. चोरटे नेमके कोणत्या उद्देशाने आले होते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खडसे यांनी चोरीच्या घटनेनंतर बंगल्यातील कपाटांमधून आणखी काही सामान चोरीला गेला आहे का याची बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना कपाटातून काही महत्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह, कागदपत्रे गायब झाल्याचे दिसून आले. त्या विषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चोरट्यांनी चोरून नेलेल्या सीडी फार महत्वाच्या नसल्या तरी कामाच्या होत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर तपासाचा भाग म्हणून आणदार खडसे यांच्या मुक्ताई बंगल्याच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रीकरण बारकाईने पाहिले. तेव्हा जळगाव शहरातील नातेवाईकांकडे आलेल्या उल्हासनगरातील तिघांनी खडसे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी केल्याचे आढळले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे माग काढला असता, तिघे मास्टर कॉलनीतील त्यांच्या एका नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त आले होते.
जळगावमध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी तिघांनी आमदार खडसे यांच्या शिवराम नगरातील बंगल्यावर चोरी केली. यापूर्वी तिघांच्या टोळीने परिसरातील इतर बंगल्यांवरही दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा त्यांना त्यात यश आले नव्हते. तिघांच्या विरोधात इतर ठिकाणी यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. जळगावमधील नातेवाईकाकडे त्यांच्या बॅग आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आढळून आली. पोलिसांकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मात्र, बॅगांमध्ये फक्त कपडेच सापडले. तिन्ही चोरट्यांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. तिघांचा शोध घेण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईतील उल्हासनगरकडे रवाना झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
