नाशिक : ईद – ए- मिलाद आणि अनंत चतुर्दशी लागोपाठ आल्याने पोलिसांसमोर बंदोबस्ताचे आवाहन आहे. सलग ४८ तास पोलिसांना बंदोबस्तासाठी रस्त्यांवर राहावे लागणार आहे. दोन हजार ५०० हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांकडून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यंदा शुक्रवारी ईद ए मिलाद आणि शनिवारी अनंत चतुर्दशी आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत. शहर परिसरात ७०० हून अधिक गणेश मंडळे असून विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीसह अन्य सार्वजनिक मंडळे सहभागी होतात. मिरवणुकीत ढोलताशे, लेझीम, चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करतात.

याशिवाय मंडळांचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्या वतीने कमानी उभारण्यात येतात. मंडप टाकले जातात. गर्दी नियंत्रणात आणतांना पोलीस प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. ही गर्दी पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहणारी ठरते. ईद आणि विसर्जन मिरवणूक यासंदर्भातील पोलीस बंदोबस्ताविषयी सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती दिली.

चार पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ४७ निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, ३७ परिविक्षाधीन उपनिरीक्षक, दोन हजार २०० पोलीस अंमलदार, ४०० महिला पोलीस अंमलदार, ११०० पुरुष गृहरक्षक आणि २५० महिला पोलीस कर्मचारी, राज्य तसेच केंद्रस्तरीय तीन तुकड्या आणि बॉम्ब शोधसाठी दोन पथके तैनात करण्यात येणार आहेत. ईद तसेच विसर्जन मिरवणूक लागाोपाठ येत असल्याने ४८ तास पोलिसांना रस्त्यावर राहावे लागणार असल्याचे मिटके यांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकीत कोणताही व्यत्यय येऊ नये, याकडे प्रामुख्याने पोलिसांचे लक्ष राहणार आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. ईद आणि विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू होईल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाच आणि सहा तारखेच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना ४८ तास काम करण्याविषयी मानसिक तसेच शारीरिकदृष्टया सक्षम करण्यात आले आहे. मिरवणूक मार्ग तसेच ईद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन हजार ५०० हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. मिरवणूक मार्गांवरील सीसीटीव्हीमध्ये एआय आधारीत कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांचे ड्रोन कॅमेरेही मिरवणुकीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. – संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक शहर)