लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: वैज्ञानिक युगातही अंधश्रध्देचे जोखड कायम असून चाळीसगाव येथील नागद रस्त्यावरील शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणाऱ्या टोळीचा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने छडा लावला आहे. याप्रकरणी मांत्रिकासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यात पाच जण नाशिक जिल्ह्यातील आहेत. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाळीसगाव येथील नागद रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोरील शेतातील पडीक घरात आषाढ अमावास्या असल्याने गुप्तधनासाठी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती पोलीस शिपाई पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळाली. त्याअनुषंगाने निरीक्षक संदीप पाटील, सहायक निरीक्षक विशाल टकले यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून मांत्रिकासह नऊ संशयितांना ताब्यात घेतले. त्यात लक्ष्मण जाधव (४५, रा. खडकी बायपास, चाळीसगाव), शेख सलीम (५६, रा. हजरत अली चौक, चाळीसगाव), अरुण जाधव (४२,आसरबारी, पेठ, नाशिक), विजय बागूल (३२, जेल रोड, नाशिक), राहुल याज्ञिक (२६, ननाशी, दिंडोरी, नाशिक), अंकुश गवळी (२१, जोरपाडा, दिंडोरी, नाशिक), संतोष वाघचौरे (४२, अशोकनगर, नाशिक), कमलाकर उशिरे (४७, गणेशपूर पिंप्री, चाळीसगाव), संतोष बाविस्कर (३८, अंतुर्ली-कासोदा, एरंडोल) यांना ताब्यात घेतले.

आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात ७२ टक्के पेरण्या; साडेचार लाख हेक्टरवर कपाशी लागवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयितांकडून भ्रमणध्वनी संच, मोटार, मानवी कवटी, लिंबू, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मूर्ती, पिवळ्या धातूचा नाग, पत्र्यावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातूचे बेरकंगण, केशरी शेंदूर, अगरबत्ती पुडा, अडकित्ता, कापराची डबी आदी पूजासाहित्य असा सुमारे आठ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई पवन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.