नाशिक – शुक्रवारी रेमंड उपकेंद्राचा वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शनिवारी महावितरणने या उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचे नियोजन केले होते. त्यामुळे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रावरून नाशिक पूर्व आणि नवीन नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार होता. तथापि, आदल्या दिवशी अकस्मात वीज खंडित झाल्यामुळे शनिवारच्या कामाचे नियोजन रद्द करण्यात आले. त्यामुळे या दिवशी उपरोक्त भागातील पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
शहरातील काही भागात मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातून पाणी उचलणाऱ्या केंद्राचा वीज पुरवठा रेमंड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. शनिवारी तिथे वीज कंपनी पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीचे काम करणार होती. तत्पूर्वी म्हणजे शुक्रवारी या वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाला. सकाळी अडीच तास मुकणे धरणातून पाणी उचलणाऱ्या केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी शुक्रवारी अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
सिडको आणि नाशिक पूर्व भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नव्हते. या घटनेमुळे महावितरणने शनिवारचे देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन रद्द केले. त्यामुळे शनिवारी विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागातील नियमितपणे पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.