धुळे : ऐन दिवाळीत तांत्रिक बिघाडामुळे धुळे जिल्ह्यातील ५४ गावांचा वीजपुरवठा शनिवारी रात्री खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिवाळीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. आणि अथक परिश्रम घेऊन अखेर वीजपुरवठा सुरळीत केला.
शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ३३ केव्ही दहिवेल वाहिनीवर झालेल्या मोठ्या बिघाडामुळे १३२ केव्ही साक्री अतिउच्चदाब उपकेंद्रातील सर्किट ब्रेकरच्या पोलमध्ये स्फोट झाला. या अपघातामुळे ३३ केव्ही दहिवेल, रोहड-जमखेल आणि धांडणे ही तीन उपकेंद्रे पूर्णतः बंद पडली. परिणामी ५४ गावे अंधारात गेली. तब्बल सात हजार ४५७ अकृषी आणि चार हजार ५०० कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ऐन दिवाळीत गावांमध्ये अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
महापारेषणकडील ब्रेकर उपलब्ध नसल्यामुळे शहादा येथून साहित्य आणण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे दुरुस्तीला किमान १२ तास लागणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र दिवाळीच्या सणाचा विचार करून महावितरणच्या साक्री आणि पिंपळनेर उपविभागातील अभियंते आणि कर्मचारी यांनी तातडीने पर्यायी उपाययोजना हाती घेतली. केवळ २० मिनिटांत ३३ केव्ही धांडणे उपकेंद्राला ३३ केव्ही कसारे उपकेंद्रावरून बॅकफीडद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर ३३ केव्ही दहिवेल फीडरचे ३३ केव्ही म्हसाडी फीडरशी समन्वय करून उर्वरित क्षेत्रालाही पुरवठा सुरू करण्यात आला. आवश्यक साहित्य मिळण्यात थोडा विलंब झाल्याने रात्री दोन वाजता अखेरीस संपूर्ण पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रितम काळे, दहिवेलचे वृषांत राठोड, साक्री शहराचे हेमंत अहिरे, पिंपळनेरचे विलास नवसरे तसेच दहिवेल, साक्री शहर आणि साक्री ग्रामीण शाखेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी आणि धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे यांनी दर तासाला आढावा घेत या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वीजपुरवठा जलदगतीने पूर्ववत होऊ शकला.
दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांना उजेडाची भेट देत महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा आणि जबाबदारीचा ठसा उमटवला. नागरिकांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. काहीवेळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागतो. तरीही अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र मेहनत करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत असतात.