जळगाव – विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या पक्षाला सावरण्यासाठी काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातील सात जणांची नुकतीच नियुक्ती केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची चांगली ताकद वाढण्याची आशा काँग्रेस बाळगून होती. प्रत्यक्षात, दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळालेल्या प्रतिभा शिंदे यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला.

तापी-नर्मदा नद्यांच्या खोऱ्यात तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी, दलित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांच्या न्याय हक्कांसाठी गेली २५ वर्षे लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून प्रतिभा शिंदे लढा देत आहेत. नंदुरबार ते मुंबई सुमारे ५०० किलोमीटर उलगुलान पदयात्रा काढून विधान भवनावर धडक देणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी मागे एकदा सरकारला चांगलेच कोंडीत पकडले होते. मुळात लढवय्या स्वभाव असलेल्या शिंदे महाविद्यालयीन जीवनापासूनच अनेक सामाजिक चळवळीशी जोडल्या गेलेल्या.

१९९२ मध्ये नर्मदा धरणाच्या विरोधातील संघर्षातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. आदिवासींसाठी अहोरात्र झटणार्‍या प्रतिभा शिंदे यांनी आदिवासींची बोलीभाषा तसेच राहणीमानही अंगिकारले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात तसेच शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने सुद्धा केली.

दरम्यान, आदिवासींसह इतर वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रतिभा शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यातील नेतृत्व गूण लक्षात घेऊन काँग्रेसने नंतर त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवली होती. पक्षाने दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी दरम्यानच्या काळात आलेल्या लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केवळ काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शरद पवार आणि ठाकरे गट यांच्याही उमेदवारांचा प्रचार केला. ठिकठिकाणी सभा गाजवून महायुतीवर जोरदार टीका केली. मात्र, जळगाव जिल्ह्यातील बलाढ्य महायुतीपुढे महाविकास आघाडीचा कुठेच निभाव लागला नाही.

पक्षाला असलेली त्यांची गरज लक्षात घेऊन काँग्रेसने नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीवर देखील त्यांची यावेळी दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. प्रत्यक्षात, पक्षाकडून पुन्हा प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही तितक्यात शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. राजीनाम्याचे नेमके कारण त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही. मात्र, मंगळवारी जळगावमध्ये आपल्या पुढील वाटचालीविषयीची भूमिका त्या पत्रकारांसमोर जाहीर करणार आहेत. त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.