नाशिक : दिवाळी संपल्याने सर्वच बस स्थानकांमध्ये आपआपल्या गावी, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी वाढत आहे. प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी खासगी बस चालकांची शहरातील स्थानकांमध्ये घुसखोरी होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

दिवाळी संपली असली तरी सुट्ट्या सुरू असल्याने मुलांसह पालक पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करीत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पर्यटकांसह प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने बस स्थानकावर होणारी गर्दी पाहता महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले. सटाणा, मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

बस संख्या वाढवली असली तरी प्रवाश्यांच्या गर्दीमुळे धुळे, पुणे, बोरिवली मार्गावर बससंख्या कमी पडत आहे. पुणे, शिर्डी तसेच सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांची गर्दी कायम आहे. बससंख्या कमी पडत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या संधीचा फायदा खासगी बस चालकांकडून घेण्यात येत आहे. खासगी वाहनचालक स्थानकांमधून प्रवासी पळवत आहेत.

विशेषत: मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी वाढणारी गर्दी पाहता खासगी बसचे चालक, वाहक थेट मुंबई नाका, ठक्कर बजार स्थानकांत येऊन प्रवासी घेऊन जात आहेत. त्यांच्या खासगी प्रवासी बसही स्थानकात येऊ लागल्या आहेत. महामंडळाच्या प्रवासी दरापेक्षा १०-२० रुपये त्यांच्याकडून अधिक घेण्यात येत आहेत. याबाबत महामंडळाच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच संबंधित संघटनांशी संपर्क करण्यात आला आहे. स्थानकाच्या २०० मीटर अंतरापासून दूर वाहने उभी करण्याची सूचना करण्यात आली आहे. नियमांचे पालन करा, असे आवाहन करण्यात आले आहे

खासगी बसचालकांशी पत्रव्यवहार

खासगी बस चालक संघटनेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्थानकात घुसू नये, वाहने कोठे लावावी, याविषयी सूचना करण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महामंडळाच्या वतीने तीन सत्रात पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी अधिकारी, कर्मचारी सातत्याने स्थानकात उभे राहतात. सद्यस्थितीत शनिवार-रविवारी पुणे आणि बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तीन ते चार दिवसात प्रतिदिवशी दोन लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. – किरण भोसले (विभाग नियंत्रक, नाशिक)