जळगाव : राजकारणाचा व्याप सांभाळून खास गाणे म्हणण्याचा छंद राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जोपासला आहे. संधी मिळेल तेव्हा पदाचा बडेजाव न मिरवता ते अगदी सहजपणे गाणे गातात. जळगावमधील युवारंग महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातही त्यांनी रविवारी गाणे गाऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सव आयोजित केला होता. त्याचे पारितोषिक वितरण मंत्री सावकारे यांच्या हस्ते झाले. भारताने जगाला संगीत आणि कला, या दोन बहुमूल्य देणग्या दिल्या आहेत. विद्यापीठाने युवारंगमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना संगीत आणि कला क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्याची संधी गेल्या २५ वर्षापासून उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी शोर या हिंदी चित्रपटातील गाजलेल्या गीतात समाविष्ट नसलेल्या परंतु लेखकाने लिहिलेल्या, तूम साथ न दे मेरा, चलना मुझे आता है… हर आग से वाकीफ हू, जलना मुझे आता है….जिंदगी और कुछ भी नहीं…. या ओळी गायिल्या.
यावेळी मंचावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अभिनेत्री केतकी माटेगावकर, प्रा. सुनील कुलकर्णी, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, प्रा.सुरेखा पालवे, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, समन्वयक डॉ. संजय शेखावत आदी उपस्थित होते.
मंत्री सावकारे भुसावळ मतदारसंघातून २००९ पासून अनुसूचित जाती राखीव जागेवर सातत्याने निवडून येत आहेत. २०१३ मध्ये तत्कालिन महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळात कृषी व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या सावकारे यांनी मेकॅनिकलमध्ये पदविका घेतली आहे. आपली व्यस्त दिनचर्या सांभाळून गाण्याची आवड जोपासण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यासाठी भुसावळ शहरातील हौशी गायकांनी मिळून तयार केलेल्या कराओके गटातही ते सहभागी झाले आहेत. संधी मिळेल तेव्हा सार्वजनिक कार्यक्रमातही ते गाणे गाताना दिसून येतात.