नाशिक – बिहारमध्ये गाजणारा मतदारयांद्यांचा विषय आता महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महत्वाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर अधिक लक्ष देण्यास सांगत असताना आता महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षही त्याविषयी सावध झाले आहेत. त्यामुळेच निवडणुका कशा जिंकायच्या हे आपणास माहिती असल्याचा दावा करणारे शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्याची वेळ आली.

शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बूथ प्रमुख कार्यशाळा आणि कार्यकर्ता, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा नाशिक येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. मेळाव्याचा प्रमुख विषय आगामी महापालिका आणि स्थानि स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी हा होता. सध्या सर्वच पक्ष मतदार याद्यांविषयी दक्षता बाळगून आहेत.

बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर निवडणुकीचा संपूर्ण प्रचारच मतदार याद्यांवरील गैरप्रकारावर सुरु केला आहे. मतदार जनजागृती यात्राही त्यांच्याकडून काढण्यात आल्या. सदोष मतदार याद्यांचा फटका निवडणुकीत बसू शकतो, हे यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या लक्षात येऊ लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांना मतदार याद्या बिनचूक कशा असतील, हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिक येथील मेळाव्यात हाच मुद्दा मांडला. निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने मतदार यादीवर काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार आणि खासदार झालेल्यांनी आता कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करूच परंतु, कार्यकर्त्यांनीही मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा. आपल्या हक्काचे मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. योग्य मतदार यादीच तुम्हाला जिंकून देईल, असा कानमंत्र शिंदे यांनी दिला.

या मेळाव्याच्या निमित्ताने आतापर्यंत निवडणूक निकाल लागल्यानंतर मतदार याद्यांविषयी ओरड करणारे राजकीय पक्ष आता निवडणुकीआधीच मतदार याद्यांविषयी जागरुक झाल्याचे दिसून आले आहे. आपले हक्काचे मतदार वगळले जाऊ नयेत,, दुसऱ्या प्रभागांमध्ये त्यांची नावे टाकली जाऊ नयेत, याकडे लक्ष देण्यात येत आहे. मतदार याद्यांमध्ये कोणाची नावे नाहीत ते शोधा, याद्या अद्यावत करा, त्यात चुका नको. निवडणुकांसाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मंत्री, अधिकारी, पदाधिकारी येतील, त्यांना खरी माहिती द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार आवाहन करावे लागले.