जळगाव – विधानसभेवर सलग नऊ वेळा निवडून गेलेले जळगावचे माजी आमदार सुरेश जैन हे १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, ते अमराठी असल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच तेव्हा त्यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शविला होता, असा गौप्यस्फोट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील मेळाव्यात केला. त्यांच्या त्या विधानामुळे सध्या राजकारणापासून अलिप्त असलेले सुरेश जैन पुन्हा चर्चेत आले आहेत.
१९८० ते २०१४ या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या काही पक्षांकडून जळगावमधून प्रत्येक वेळी मोठ्या मताधिक्याने विधानसभेची निवडणूक सुरेश जैन यांनी जिंकली होती. दरम्यान, शिवसेनेने एकदा त्यांना मंत्रीपदाची संधीही दिली. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपल्याला मंत्रीपदाचा मान मिळाल्याचा उल्लेख करून त्यांचे ऋण आपण कधीच विसरणार नसल्याचे उल्लेख जैन यांनी त्यांच्या जळगावमधील जाहीर सभांमध्ये अनेक वेळा केला सुद्धा होता.
असे असताना, १९९९ मध्ये भाजपसह शिवसेनेला बहुमतापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेणारे सुरेश जैन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसह शिवसेनेकडून पुढे आल्यानंतर त्यांच्या नावाला सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी ते अमराठी असल्याने विरोध दर्शविला होता, अशी आठवण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शुक्रवारच्या मेळाव्यात सांगितली.
यापूर्वीही राज ठाकरे यांनी सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यास बाळासाहेब ठाकरे यांचाच सर्वात जास्त विरोध होता, अशी वक्तव्ये केली आहेत. अर्थात, जैन यांनी त्याविषयी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्नही केला होता. आता पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर बोलताना जैन यांचे मुख्यमंत्रीपद का नाकारले गेले होते, त्याविषयी पुन्हा थेट भाष्य राज ठाकरे यांनी केले. यापार्श्वभूमीवर सुरेश जैन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन जैन यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठींबा दिला होता. त्यानंतर पुन्हा ते राजकारणापासून दूर गेले होते. तशात काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव विमानतळावर जैन यांची योगायोग भेट झाल्यानंतर ते अजुनही आमचे नेते असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती.