Tejas MK-1 Fighter Jet Launch Nashik : नाशिक : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील प्रकल्पात तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाची तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी – ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. त्यानंतर या प्रकल्पात निर्मिलेल्या पहिल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाने आकाशात झेप घेतली. पाठोपाठ एचटीटी – ४० हे प्रशिक्षणार्थी आणि नंतर सुखोई – ३० एमकेआय हे लढाऊ विमान झेपावले. तेजस आणि एचटीटी विमानांनी अवकाशात विलक्षण थरारक कसरती सादर केल्या.

ओझर येथील एचएएल प्रकल्पात झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे प्रमुख डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळल्यापासून राजनाथ सिंह यांची ही एचएएल नाशिक प्रकल्पास ही पहिलीच भेट होती. या प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे व पायाभूत सुविधांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही सुखद धक्का बसला. याच ठिकाणी सुमारे २५० सुखोई ३० एमकेआय विंमानांची निर्मिती झाली.

मिग श्रेणीसह सुखोईची देखभाल दुरुस्तीचे काम येथे चालते. या प्रकल्पाच्या कामगिरीवर त्यांनी भाषणातून प्रकाशझोत टाकला. प्रारंभी तेजस एमके-१ ए, एचटीटी – ४० आणि सुखोई विमानाच्या अवकाशात कसरती सादर झाल्या. या कसरती आपण बारकाईने पहात होतो, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तेजस एमके-१ ए विमानाचे सारथ्य करणारे स्कॉड्रन लिडर के. वेणूगोपाल, एचटीटी-४० या प्रशिक्षणार्थी विमानाचे वैमानिक प्रत्युश अवस्थी आणि सुखोई – ३० वि्मानाचे विंग कमांडर एम. के. लथ आणि संजय परमार यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. संरक्षणमंत्री सिंह यांच्याबरोबर या वैमानिकांनी एकत्रित छायाचित्र काढले.

तेजस, एचटीटीच्या विलक्षण कसरतींनी उपस्थित भारावले होते. त्यामुळे कार्यक्रम संपताच संबंधितांकडून या वैमानिकांंबरोबर छायाचित्र काढण्यासाठी लगबग सुरू झाली. बंदोबस्तावर असणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी असो वा, शासकीय अधिकारी, इतर मंडळी प्रत्येकाकडून संबंधित विमानासमोर वैमानिकांबरोबर छायाचित्र काढले जात होते.

एचएएल नाशिक प्रकल्पात निर्मिलेल्या पहिल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे वेणूगोपाल हे एचएएलचे मुख्य चाचणी वैमानिक आहेत. त्यांच्याकडे हवाई उड्डाणाचा मोठा अनुभव आहे. फ्रेंच बनावटीचे राफेलही त्यांनी चालवले आहे. यावेळी वेणूगोपाल यांनी मिग २१ विमानांचे हवाई दलात महत्वपूर्ण योगदान राहिले होते, असे निर्दशनास आणले. तेजस मोठ्या संख्येने समाविष्ट होणार असल्याने तेजस एमके-१ ए विमानांचे मिग – २१ पेक्षा अधिक योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला. तेजस केवळ दलातील अनुभवी वैमानिकांच्या हाती सोपविले जाईल का, या प्रश्नावर त्यांनी तसे काहीही नसल्याचे नमूद केले. राफेल आणि तेजसच्या सारथ्यात काय फरक जाणवतो, यावर वेणूगोपाल यांनी तेजस एमके-१ ए हे आपले स्वप्न होते, अतिशय सहजपणे ते हाताळता येते, अशी भावना व्यक्त केली.