नाशिक – रामकाल पथ योजनेत रामकुंड आणि श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मंदिरांसह परिसरातील इमारतींची दुरुस्ती, नुतनीकरण आणि जीर्णौद्धारासाठी २२ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामास लवकरच सुरूवात होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. रामकाल पथ प्रकल्पात गोदावरीच्या काठावरील पुरातन मंदिर आणि इमारतीच्या दर्शनी भागातील दुरुस्ती, नुतनीकरण, जीर्णोद्धार करण्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देण्यात आली. या कामासाठी पहिल्या निविदा प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. फेरनिविदेत प्राप्त झालेल्या निविदांची पडताळणी करून प्राकलन दरापेक्षा ०.५० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या सवामी हेरिजेट कन्झरवेशन कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यटन विभागाने रामकाल पथ हा ९९.१४ कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. परंतु, या प्रकल्पासाठी १४६ कोटींची खर्च येणार आहे. केंद्राच्या मंजुरी व्यतिरिक्त उर्वरित ४६.९६ कोटींच्या प्रकल्पास राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजुरी देण्याचा ठराव आधीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे.
केंद्राने मंजूर केलेल्या प्रकल्पानुसार पहिल्या टप्प्यात रामकुंड आणि काळाराम मंदिर परिसरातील पुरातन मंदिरे, इमारतींची दुरुस्ती, नुतनीकरण, जीर्णोद्धार करण्याच्या कामासाठी २२ लाख ६७ हजार रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले होते. यात मुख्यत्वे दगडकाम, लाकडी काम, दगडी फरशी, वीट बांधकाम, प्लास्टर आदींचा समावेश होता. प्राकलन दरापेक्षा ०.५० कमी दराने हे काम करून देण्याची तयारी दर्शविणाऱ्या ठेकेदार कंपनीशी करार करण्यास मान्यता देण्यात आली.
सुशोभिकरणावर भर
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सितागुंफा ते काळाराम मंदिर, सरदार चौक ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सितागुंफा रस्ता रुंदीकरण, काळाराम मंदिर चौक ते उद्यान सुशोभिकरण, काळाराम मंदिर ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर रुंदीकरण व सुशोभिकरणाचा अंतर्भाव आहे. रामकुंड व काळाराम मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यांचा जीर्णोद्धार या माध्यमातून होणार आहे.