नाशिक – मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीमध्ये नृत्य करणारे तत्कालीन शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या चित्रफिती महायुतीतील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी सर्वांसमोर आणल्या होत्या. बडगुजर यांना देशद्रोही, समाजकंटक वगैरे बरीच विशेषणे थेट विधानसभेतही भाजपने लावली होती. आणि दीड वर्षात तेच बडगुजर आता भाजपवासी झाले आहेत. बडगुजर यांच्याविरुद्ध विविध स्वरुपाचे एकूण २९ गुन्हे दाखल आहेत.

बडगुजर यांची ही पार्श्वभूमी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली होती. मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, सलीम कुत्ता यांच्याशी बडगुजर यांचे संबंध असून या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. चित्रफिती उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा विषेथ पथकामार्फत तपास करण्याची घोषणा अधिवेशनात झाली होती. भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या प्रवेशास कडाडून विरोध केला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना प्रवेश देण्यात आला.

अडीच दशकांपूर्वी नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याशी बडगुजरांनी जवळीक साधली. महापालिकेतील ठेकेदारीत जम बसवला. २००७ मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिकेत सातत्याने निवडून येत सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी महत्वाची पदे मिळवली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोनवेळा उमेदवारी मिळूनही ते पराभूत झाले. खासदार संजय राऊत यांचे निष्ठावान अशी त्यांची स्थानिक शिवसेनेत ओळख होती. त्यामुळेच शिवसेना दुभंगल्यानंतरही त्यांनी राऊत यांची साथ सोडली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा विरोध असतानाही राऊत यांच्यामुळेच बडगुजर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. काही वर्षांपूर्वी महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांनी येथे आयोजिलेला महिला मेळावा उधळून लावणे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी केलेली अटक अशा अनेक घटनांशी बडगुजरांचा संबंध भाजपचे स्थानिक पदाधिकारी जोडतात.