धुळे : येथील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर आजही ’औरंगाबाद’ असाच उल्लेख कायम राहिला आहे. यामुळे संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आज तीव्र संताप व्यक्त करत ’छत्रपती संभाजी नगर’ असा उल्लेख करावा अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला. शासकीय पातळीवर सर्वत्र ’औरंगाबाद’चे नामकरण ’छत्रपती संभाजीनगर’ असे झाले असतानाही धुळे शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील नगावबारी येथे असलेल्या साई किसन हॉटेलसमोरच्या दिशादर्शक फलकावर मात्र ‘औरंगाबाद’ असाच उल्लेख आजही कायम राहिला आहे.
ही चूक लक्षात आल्यावर आज या फलकावर संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली आणि जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन दिले. दोन दिवसांच्या आतच संबंधित दिशादर्शक फलकावर दुरुस्ती करून ’औरंगाबाद’ एवजी ’छत्रपती संभाजी नगर’ असा उल्लेख करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राला दैदिप्यमान असे इतिहास लाभला. हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केले. मात्र ज्या औरंगजेबाने महाराजांची निर्घृण हत्या केली, त्या औरंगजेबाचाच नामोल्लेख म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे ’औरंगाबाद’ असे नाव पडले असे यावेळी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत संभाजी ब्रिगेडसह सर्व शंभूप्रेमी संघटनांनी आज ’औरंगाबाद’ या नावावर तीव्र शब्दात आक्षेप घेतला. या नामोल्लेखाला तीव्र विरोध दर्शवला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास वारंवार लेखी सूचना देण्यात आल्यानंतरही दिशादर्शक फलकावरचे नाव बदलले नाही अखेर जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदन देणे भाग पडले अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शिष्टमंडळात धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, महेश पाटील, आर.वाय. मंडाले, बी.ए. पाटील, नंदु अहिरराव, अमर फरताडे, दिनकर जाधव, मनोज रुईकर, डॉ. नागेश पाटील, नितीन जाधव, कैलास देसले, भुषण बागुल, अशोक जाधव, उदय पवार, शाम बोरसे, जितेंद्र पाटील, धनंजय गाळणकर यांचा समावेश होता.
