महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा
रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये सुरू करण्यासाठी महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानने पुढाकार घेण्याचे आवाहन रामटेक येथील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनी केले.
महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या ११ व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. डॉ. वैद्य यांच्या हस्ते महापालिका स्थायी समिती सलीम शेख, मधुरा बेळे, हर्शल पुजारी, अक्षय महाले, धीरज बच्छाव यांना कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शंकराचार्य न्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत सागरानंद सरस्वती होते. व्यासपीठावर धनंजय बेळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दतात्रय पठणे, सचिव रवींद्र पठणे, कार्यकारी विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर उपस्थित होते.
संस्कृत ही मानवी संस्कृती संपन्न करणारी भाषा आहे. तिचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. वेद, उपनिषदे व एकूणच आध्यात्मिक परंपरांची मूल्ये संवíधत करण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे कुलगुरू डॉ. वैद्य यांनी नमूद केले. महाराष्ट्रात एकमेव असलेल्या रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
नाशिक व त्रंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेला या केंद्राचा उपयोग होऊ शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना सलीम शेख यांनी कुराण आणि पुराण यातील साम्यस्थळे शोधून समन्वय व सामंजस्य वाढविण्याचे प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
अलीकडच्या काळात माणसे धार्मिक होण्याऐवजी धर्मवेडी होऊन िहसा घडवीत असून ही चिंतेची बाब आहे. ही प्रवृत्ती बदलण्यासाठी धार्मिक सलोखा व सुसंवाद वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सागरानंद सरस्वती यांनी वेद परंपरेचे महत्त्व मांडले.
संस्कृत संवर्धनासाठी शासनाने अधिक निधी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन मनीषा एकबोटे यांनी केले. आभार गोविंद पैठणे यांनी मानले.