नाशिक : विभागात सात वर्षात सुमारे ३०० बस कालबाह्य झाल्या असून सध्या केवळ ७५० बसेस कार्यरत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून सिंहस्थात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे लक्ष वेधत बसेसचा तुटवडा दूर करण्यासाठी नाशिकसाठी ३०० नवीन बस तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.

कमतरतेमुळे जिल्हावासियांकडून वाढीव बसची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आमदार हिरे यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांची भेट घेतली. नाशिक विभागातील काही वर्षांपूर्वीची आणि सध्याची स्थिती मांडली. २०१८ मध्ये नाशिक विभागात १०५० बसेस कार्यरत होत्या. जुनाट बसेस जीर्ण होऊन ३०० बसेस कायमस्वरुपी मोडीत निघाल्या. आजमितीस विभागात ७५० ते ८०० बसेस कार्यरत आहेत. जिल्हयात प्रवाशांची संख्या वाढत असताना बसेसची संख्या कमी झाल्याने सर्वत्र बससेवेचा तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रवासी व मुख्यत्वे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याकडे हिरे यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकिकडे बसेसची संख्या कमी होत असताना दुसरीकडे नाशिकहून तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, पंढरपूर, शेगांव, शिर्डी, कोल्हापूर, अक्कलकोट, शेवगांव आदी राज्यातील धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी अधिकच्या बस सोडण्याची मागणी सातत्याने होत आहे. बस उपलब्धतेची स्थिती गंभीर आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक विभागासाठी ३०० नवीन बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हिरे यांनी केली.