नाशिक – गलेलठ्ठ वेतन असतानाही शासकिय अधिकार्‍यांना पैशांची हाव काही सुटत नाही. दुसर्‍यांकडून जितके ओरबाडता येईल, तितके ओरबाडण्याची वृत्ती त्यांना एक दिवस अडचणीत आणते. असाच प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नाशिक सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. संबंधित वरिष्ठ अधीक्षकाला न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचार्‍यांकडून पैशांची मागणी होत असल्यास पैसे देऊ नयेत, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायम करण्यात येते. परंतु, तरीही झटपट काम होण्यासाठी काही जण अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देतात. त्यामुळे शासकिय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे चांगलेच फावते. त्यामुळे पैसे घेतल्याशिवाय कामच करायचे नाही, अशी त्यांना सवयच लागते.

नाशिक सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यालाही अशीच सवय लागली होती. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या कसबे वणी येथील उद्योजकावर जीएसटीसंदर्भात कोणतीही कारवाई न करण्यासाठी शर्माने ५० लाख रूपयांची मागणी केली. इतकी रक्कम देणे अशक्य असल्याचे संबंधित उद्योजकाने सांगितल्यानंतर २२ लाख रुपये देण्यावर तडजोड झाली. शर्मा २२ लाख रुपये मिळणार असल्याच्या आनंदात असताना संबंधित उद्योजकाने पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

दरम्यान, पाच लाख रुपये कोणत्या दिवशी द्यायचे आणि उर्वरित रक्कम किती दिवसांनी द्यावयाची, या संदर्भातील माहिती नाशिक सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक हरिप्रकाश शर्माने संबंधित उद्योजकाला दिली. शहरातील सेंट्रल जीएसटी कार्यालयात लाच स्वरुपातील पहिला हप्ता म्हणजे पाच लाख रुपये उद्योजकाकडून स्वीकारताना शर्मा हा सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीएसटीचा अधिकारीच लाच स्वीकारताना जाळ्यात सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वेतन असते. तरीही ते काम करून देण्याच्या मोबदल्यात इतरांकडून पैसे मागत असतात. विशेष म्हणजे, अशाप्रकारे पैसे मागताना अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. त्यांच्याकडून बिनदिक्कतपणे पैशांची मागणी केली जाते.

लाचखोर अधिकारी, कर्मचार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई केली जात नसल्याने असे अधिकारी, कर्मचारी निर्ढावतात, असे लोकांचे म्हणणे आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादी खासगी व्यक्ती पैशांची मागणी करीत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.