नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना नाशिक जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, एकेक विषय मांडण्यास सुरुवात झाली असून आता जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण धरण असलेल्या भावलीतून शेजारील ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यास पाणी देण्यास विरोध सुरु झाला आहे.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शहापूरला पाणी देण्यास तीव्र विरोध केला असताना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रघुनाथ तोकडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून शहापूरला पाणी न देण्याची कारणे मांडली आहेत. त्यामुळे इगतपुरी विरुध्द शहापूर पाणी प्रश्न ऐन पावसाळ्यात पेटला आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणासाठी अनेक शेेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. या धरणाची निर्मिती होण्यासाठी इगतपुरीतील शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ इगतपुरी तालुकावासियांनाच मिळाले पाहिजे, त्यामुळे भावली धरणाचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही, असा इशारा माजी खासदार तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) ज्येष्ठ नेते हेमंत गोडसे यांनी दिला आहे. भावली धरणाची पाणी साठवण क्षमता १४३४ दशलक्ष घनफूट आहे. सततच्या पावसामुळे सध्या भावली धरण तुडुंब भरले आहे.
भावली धरणातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला पाणी देण्याबाबत शासनाचे धोरण आहे. या धोरणाला इगतपुरी तालुक्याचा विरोध आहे. याबाबत यापूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार हिरामण खोसकर यांनी प्रश्न उपस्थित करून भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यास हरकत घेतली होती. भावली धरणातून इगतपुरी नगरपालिका, घोटी ग्रामपालिका यासह अन्य १० ते १२ गावे पिण्याच्या पाण्यासाठी भावली धरणावरच अवलंबून आहेत. त्यात टंचाईच्या काळात या धरणातून मराठवाडा, अहिल्यानगर आदी भागात आरक्षित पाणी सोडले जाते. उन्हाळा सुरु झाल्यावर एप्रिल, मे महिन्यात धरण कोरडे पडते.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शहापूरसाठी अन्य धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करत भावली धरणातून पाणी देण्यास हरकत घेतली आहे. शहापूरला अन्य धरणातून पाणी दिल्यास भावली धरण परिसरातील जलस्रोतांचे संतुलन राखले जाऊन स्थानिकांना भेडसावणार्या पाणीटंचाईचा प्रश्नही निकाली निघेल, असे त्यांनी म्हटटले आहे.
अत्यंत कमी साठवण क्षमता असलेल्या भावली धरणावरर अनेक गावे, आरक्षित पाणी याचा भार आहे, त्यात शहापूर तालुक्याला पाणी दिल्यास आरक्षित पाणीवजा जाता इगतपुरी, घोटी यांसह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रघुनाथ तोकडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन देत शहापूरला पाणी देण्यास विरोध केला आहे.
भावली धरणासाठी भूसंपादनावेळी तीन गावे आणि तीन वाड्या विस्थापित झाल्या असून त्यांचे पुनर्वसन योग्य रितीने झालेले नाही. भावली धरणामुळे या भागातील शेतकरी भूमिहीन झाला. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी शहापूरला पाणी देण्यास विरोध दर्शविण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार असून विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल, असे तोकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उचलण्याची परवानगी मिळावी. भावली परिसराला पर्यटन केंद्राचा दर्जा दिल्यास स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. भावली धरणातून दरवर्षी मराठवाड्याला पाणी सोडून देण्यात येत असल्याने ऐन उन्हाळ्यात येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे स्थानिकांचा विरोध डावलून शहापूरला पाणी दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तोकडे यांनी दिला आहे.