लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: शहरातील दरेगाव भागातील एका शेतघरावर कारवाई करत पवारवाडी पोलिसांनी सहा हरणांचे सुमारे १२० किलो मांस तसेच गावठी बंदूक, एक गोळी व एक लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या हरणांची अन्यत्र शिकार करून त्यांचे मांस येथे विक्री करण्याचा यामागे प्रयत्न असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

दरेगाव शिवारातील मोहंमद अमीन याच्या शेतघरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यात गावठी बंदूक, एक गोळी, कोयता व सहा हरणांचे मांस आढळून आले. त्या ठिकाणी असलेल्या शेख शब्बीर शेख रज्जाक, शौकत हुसेन व दानिश शेख या तिघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. शेत घराचा मालक मोहम्मद अमीन व मुदसिर अकील यांनी ही हरणे आणली होती, अशी माहिती या तिघा संशयितांनी दिली.

हेही वाचा… नाशिक : लाच स्वीकारताना सिन्नर तालुका कृषी अधिकारी जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पकडलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी लागलीच अटक केली असून मोहम्मद अमीन व मुदसिर अकील यांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या हरणांची कुठून शिकार केली होती, याचाही तपास पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उप अधीक्षक तेजबिर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.