लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : जिल्ह्यातील चारही तालुक्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या सुमारे ३८१ टवाळखोरांविरुध्द पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांना शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने धुळ्यासह साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थांजवळ फिरणाऱ्या टवाळखोरांना हटकण्यात येत आहे.

आणखी वाचा-तहसीलदारांच्या आंदोलनाने महसूल विषयक कामकाज विस्कळीत

धुळ्यात पथकाने जयहिंद महाविद्यालय देवपूर, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, नॅशनल उर्दू शाळा चाळीसगांव रोड, भावरी महाविद्यालय धुळे तालुका, सी.एस.बाफना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श शाळा निजामपूर, गर्ल्स हायस्कुल, बीओडी महाविद्यालय, नुतन महाविद्यालय दोंडाईचा, सना शाळा चाळीसगांव रोड, खासगी शिकवणी केंद्र देवपूर, बाफना शाळा धुळे शहर, एस.टी.गुजर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेटावद, एसएसव्हीपीएस महाविद्यालय शिंदखेडा, मुलींचे वसतिगृह, शिरपूर तालुका, साक्रीमधील विद्यावर्धिनी महाविद्यालय या १३ शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विशेष मोहिमेंतर्गत विनाकारण फिरणाऱ्या आणि टवाळखोरी करणाऱ्या युवकांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्याकडील शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, दुचाकी परवाना तपासण्यात आला.

यावेळी अनेकांकडे ओळखपत्र व दुचाकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी अशा टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई केली. काही शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभारी अधिकारी आणि दामिनी पथकाद्वारे विद्यार्थिनींचे समुदेशनही करण्यात आले. कोणाविषयी काही तक्रार असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special campaign of dhule superintendent of police for those loitering outside schools colleges mrj
First published on: 06-12-2023 at 13:05 IST