लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही मोहीम सोमवारी सकाळपर्यंत सुरू होती.

काही दिवसांपासून शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया होत असल्याने नाशिककरांचा पोलिसांवरील रोष वाढू लागल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. अशीच एक मोहीम रविवारी रात्रीपासून राबविण्यात आली. उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि अन्य अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. रविवारी रात्री १० वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत या मोहिमेतंर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी करण्यात आली. हॉटेल, लॉज, धाबे, नोंदीतील गुन्हेगारांची तपासणी, संशयितांची चौकशी, हद्दपारीतील गुन्हेगार आढळल्यास कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक: प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर, चार व्यावसायिकांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईत १९ ठिकाणी नाकाबंदी झाली. यामध्ये दोनशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ११९ हॉटेल, लॉज यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत चार फरार गुन्हेगार पकडण्यात आले. २० जणांना अजामीनपात्र हुकूम बजावण्यात आला. ३९ तडीपारांची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारची ही मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.