जळगाव : दिवाळीच्या काळात एसटीसह खासगी निमआराम बसेस आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने जळगाव-भुसावळमार्गे अमरावती-पुणे दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर आहे.
दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त साधून प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून एकूण ९४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या गाड्यांव्यतिरिक्त प्रशासनाकडून आणखी १८२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा देखील समावेश आहे. प्रामुख्याने अमरावती-पुणे दरम्यान चालविण्यात येणारी विशेष रेल्वे गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जास्त सोयीची ठरणार आहे. ०१४०३ साप्ताहिक विशेष गाडी सात ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होतील.
याशिवाय, ०१४०४ साप्ताहिक विशेष गाडी आठ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा आठ फेऱ्या होतील. चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह धावणाऱ्या या गाडीला जळगाव आणि भुसावळ या महत्वाच्या स्थानकांसोबत चाळीसगाव येथेही दोन्ही बाजुने थांबा देण्यात आला आहे. चाळीसगाव शहर व तालुका तसेच लगतच्या धुळे जिल्ह्याचे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्गाला त्याचा लाभ दिवाळी सणाच्या काळात होऊ शकणार आहे.
खासदार स्मिता वाघ यांचे प्रयत्न
पैकी, चाळीसगाव स्थानकावर ०१४०३ पुणे–अमरावती विशेष एक्स्प्रेस सकाळी ०४.२८ वाजता येईल आणि -४.३० वाजता रवाना होईल. याशिवाय, ०१४०४ अमरावती–पुणे विशेष एक्स्प्रेस सायंकाळी ०५.१३ वाजता येईल आणि ०५.१५ वाजता रवाना होईल. पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी विशेष गाडीला दोन्ही बाजुने चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा म्हणून जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पाठपुरावा केला होता. चाळीसगावकरांची ही जुनी मागणी होती. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरदारांना नोकरीसाठी तसेच व्यावसायिक व व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी ही गाडी सोयीची ठरेल. विशेष म्हणजे नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचू शकणार आहे, असे खासदार वाघ यांनी सांगितले.