कमोदनगरसमोर उपरस्त्याच्या कामास सुरुवात

रस्त्याच्या कामासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल.

कमोदनगरसमोरील उड्डाणपुलाजवळ कामाला झालेली सुरूवात

उड्डाणपुलावरील अपघातानंतर प्राधिकरणाला जाग

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल ओलांडताना झालेल्या अपघातात बुधवारी  आई आणि मुलास प्राण गमवावे लागल्यानंतर परिसरातील त्याचे तीव्र पडसाद उमटून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची त्वरित दखल घेत शुक्रवारी कमोदनगर परिसरात उड्डाणपुलाला उपरस्ता करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम पूर्ण होईपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक  एकाच भागातून दुतर्फा सुरू राहणार आहे.

शुक्रवारी अपघातग्रस्त ठिकाणी रहिवासी जमू लागताच अंबड तसेच इंदिरानगर ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी धडकला. सीमा हिरे, देवयानी फरांदे या दोन आमदारांसह खासदार हेमंत गोडसे आणि प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी आले. कमोदनगर परिसरात सुंदरबन कॉलनीच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर उड्डाणपुलाला जोड रस्ता देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. भूमिपूजन अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबातील आशीष तांबट यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर जेसीबीच्या मदतीने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. उड्डाणपुलाच्या दुतर्फा हे काम एकाच वेळी सुरू करण्यात आले. काम सुरू असताना पोलीस, लोकप्रतिनिधींची वाहने तसेच बघ्यांची गर्दी यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. वाहतूक पोलिसांनी चार चाकी वाहने दुसऱ्या मार्गाने वळविली.

रस्त्याच्या कामासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. जोडरस्त्याच्या कामामुळे सव्‍‌र्हिस रस्त्यावरील वाहतुकाला काही अंशी अडथळा निर्माण होईल. उड्डाणपुलाचा काही भाग खोदण्यासाठी जेसीबी, बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी प्राधिकरणच्या वतीने भुजबळ फार्मच्या अलिकडेच व्यवस्था करण्यात आली आहे. येथील रस्ता रुंद असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही. यावर पर्याय म्हणून सव्‍‌र्हिस रस्त्यावर  प्राधिकरण झेब्रा क्रॉसिंगचा अवलंब करणार असल्याचे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत कडुस्कर यांनी सांगितले.

एकाच रस्त्यावर दुतर्फा वाहतूक

रस्त्याच्या कामामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुलावरील वाहतूक एकाच रस्त्यावरून दुतर्फा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी इंदिरानगर ते लेखानगर दरम्यान एका ठिकाणी आणि राणेनगर येथील पुलाच्या उंचवटय़ावर नाशिकहून मुंबईकडे, मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बदलला जाईल. साधारणत पुलाची रुंदी ११ मीटर असल्याने अवजड वाहनांना अडचण येणार नसल्याचा दावा प्राधिकरणने केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Start of work in front of kamodnagar

ताज्या बातम्या