जळगाव : जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे ४०१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊन २०५१ गावांमधील तब्बल ३४८८ शेतकरी बाधित झाले. पावसामुळे सर्वाधिक १९८४ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी जळगाव तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
वादळी वाऱ्यासह पावसाने भडगाव तालुक्यात ९६६ हेक्टर, एरंडोल तालुक्यात ४८८ हेक्टर, पाचोरा तालुक्यात ३४१ हेक्टर, जामनेर तालुक्यात ७७ हेक्टर, चाळीसगाव तालुक्यात ५५ हेक्टर, जळगाव तालुक्यात ३२ हेक्टर, धरणगाव तालुक्यात १५ हेक्टरवरील केळीच्या बागा भूईसपाट झाल्या. याशिवाय, सुमारे १८९० हेक्टरचे इतर फळपिकांचे तसेच १२० हेक्टरवरील पपईचे नुकसान झाले आहे. १४ हेक्टरवरील भाजीपाला, सात हेक्टरवरील उसाचेही नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार, पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
वीज कोसळून ३०० क्विंटल कांदा खाक
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील शेतकरी धनराज जाधव यांच्या कांदा चाळीवर बुधवारी रात्री वीज कोसळली. त्यामुळे आग लागून चाळीत साठवलेला सुमारे ३०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गुरूवारी पाटणा येथे भेट देऊन नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला. तेव्हा शेतकरी जाधव यांना अक्षरशः रडू कोसळले. तहसीलदारांनी त्यांना धीर देत भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
केळीबागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी
जळगाव तालुक्यातील दापोरा आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे काढणीवरील केळीच्या बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्याशी शेतातून संपर्क साधत नुकसानीचे तातडीने शंभर टक्के पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीतजास्त भरपाई देण्याची मागणी केली. वादळी पावसामुळे तुकाराम घुले, सागर घुले, विनोद चव्हाण, माणिक पाटील, पुंजू मराठे, पुंडलिक सुरवाडे यांचेसह अन्य शेतकऱ्यांच्या केळीबागा भूईसपाट झाल्या. संबंधित सर्व शेतकऱ्यांना धीर देऊन कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी शेताच्या बांधावरून माजी मंत्री देवकर यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
पंचनामे करताना नुकसानीची शंभर टक्के नोंद घेऊन केळी उत्पादकांना जास्तीत जास्त भरपाई देण्याची व्यवस्था करावी. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे फक्त पंचनामे करण्यात आले. भरपाई मात्र मिळालीच नाही. त्यामुळे तशी परिस्थिती यावेळी निर्माण होणार नाही, त्यादृष्टीने कृषी विभागाला आदेश देण्याची मागणी त्यांनी केली. त्यासंदर्भात जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना सोनवणे, दापोऱ्याचे सरपंच गोविंदा तांदळे, तलाठी मयूर महाले, पोलीस पाटील जितेश गवंदे, तुकाराम तांदळे, महादू पानगळे, पुरूषोत्तम काळे, मुकेश गवंदे, भूषण पाटील, ज्ञानेश्वर वाणी, गणेश शिंदे, संदीप पानगळे, निंबाजी गवंदे, वाल्मिक पाटील, समाधान निकुंभ व गावातील शेतकरी उपस्थित होते.