नाशिक – दिंडोरीची जागा आम्हाला न सोडल्यास ती स्वबळावर लढण्याची घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली असून संभाव्य बंड रोखण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने धडपड सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माकपचे माजी आमदार व इच्छुक उमेदवार जिवा पांडू गावित आणि डॉ. डी.एल. कराड यांच्याशी चर्चा करुन मनधरणी केली. या संदर्भात शरद पवार आणि माकपच्या वरिष्ठ नेत्यांची लवकरच बैठक बोलावली जाणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरीत भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी जाहीर झाली. राष्ट्रवादीच्या कृतीला विरोध करीत माकपने दिंडोरीत महाविकास आघाडीने ही जागा न दिल्यास गावित यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, नाशिक येथे आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विमानतळाजवळील एका रिसॉर्टवर माकप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – नाशिकमध्ये शिंदे गटाचा मार्ग मोकळा; गोडसे की बोरस्ते ?कोणाला उमेदवारी? 

देशपातळीवर इंडिया आघाडी आकारास आली असून माकपने स्थानिक पातळीवर वेगळा विचार करू नये, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. माकपने लोकसभेसाठी उमेदवारी करू नये, अशी विनंती करीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत चार जागांवर मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. दिंडोरीची जागा न मिळाल्याने माकपचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. महाविकास आघाडीने निर्णय प्रक्रियेत माकपला समाविष्ट केले नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. माकपला दिंडोरीची जागा लढवायची आहे. राष्ट्रवादीने स्थानिक पदाधिकाऱ्यांऐवजी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, असे सुचविण्यात आले. या संदर्भात शरद पवार आणि माकपचे नेते, पदाधिकारी यांची मुंबई अथवा पुणे येथे बैठक बोलाविली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत ? – रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचाराचा आढावा

साधारणत: एक, दीड तासाच्या बैठकीत जयंत पाटील यांनी दिंडोरी मतदारसंघातील प्रचाराचा तालुकानिहाय आढावा घेतला. तालुकाध्यक्षांशी संवाद साधून प्रचाराबाबत माहिती घेतली. जाहीर सभा कुठे घ्यायच्या, वक्ते कोण हवेत, आदी जाणून घेत पुढील प्रचाराची दिशा कशी असावी यावर त्यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली.