नाशिक – सातपूर परिसरात खासगी शिकवणी वर्गाबाहेर मित्रांनी केलेल्या मारहाणीत अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना गंगापूर रस्त्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर आणि पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर मराठा शाळेच्या प्रवेशद्वारावर टोळक्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झाले.
स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन सोहळ्यात नाशिककर मग्न असताना शाळकरी विद्यार्थ्यांवर पोलीस ठाण्यासमोरत झालेल्या हल्ल्यामुळे शहरात पोलिसांचा कोणीही धाक बाळगेनासे झाले असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. याबाबत कार्तिक ठोंबरे (१७) या विद्यार्थ्याने तक्रार दिली. टोळक्याच्या हल्ल्यात तक्रारदारासह त्याचा मित्र सुमित माने गंभीर जखमी झाले. या प्रकरणी साई कुटे, आर्यन मोगरे, प्रणव मणारे, ओम मुर्तडक, अजिंक्य वाघमारे, प्रिन्स आणि भावेश या संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांसह सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा झाला. मराठा शाळेतील विद्यार्थी ध्वजवंदन करून सकाळी नऊ वाजता घरी निघाले होते. तेव्हा ही घटना घडली. तक्रारदार हा मित्र आयुष पाटील आणि सुमित माने या मित्राला पेट्रोल देण्यासाठी गेले होते. संशयित टोळक्याने इंस्ट्राग्रामवर टाकलेल्या संदेशाच्या कारणावरून कुरापत काढून आयुष पाटीलला धमकावत चापट मारली. त्यामुळे आयुष पळून गेला. नंतर टोळक्याने कार्तिक ठोंबरे आणि सुमित माने यांना मारहाण केली. यावेळी चॉपरचा वापर केला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
टोळके मारहाण करत असताना मुले मदतीसाठी आरडाओरड करत होते. टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. नंतर टोळके पळून गेले. टोळके धुडगूस घालत असताना सरकारवाडा पोलीस ठाण्यातून कोणीही घटनास्थळी आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. जखमी मुलांना एका रिक्षा चालकाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंनंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका मुलाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत तर दुसऱ्या मुलाच्या डोक्याला पाठीमागे व अन्य ठिकाणी दुखापत झाली आहे. मारहाणीची ही घटना शाळकरी विद्यार्थ्यांसमोर घडल्याने त्यांच्यात भीती पसरली आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून टोळक्यांकडून मारहाण, धुडगूस घालण्याचे प्रकार वाढत आहेत. गंगापूर रस्त्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर आणि पोलीस आयुक्तालयापासून जवळच मविप्र शिक्षण संस्थेचे मराठा हायस्कूल व अन्य महाविद्यालये आहेत. या ठिकाणी टोळक्याने विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा महाविद्यालय व पोलीस ठाणे यात गंगापूर रस्त्यावर उड्डाण पूल आहे. त्यामुळे पलीकडच्या बाजूकडील घटना लगेच दृष्टीपथास पडत नसल्याचे सांगण्यात येते.