Sudhakar Badgujar expelled from Shiv Sena : नाशिकमधील शिवसेना (ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुधाकर बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेतील रिक्त जागा भरण्याची मागणी केल्याचं सांगण्यात आलं होतं. महापालिकेतील ७,००० कर्मचाऱ्यांपैकी ४१ पदे रिक्त असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी बडगुजर यांनी राऊत यांच्याऐवजी फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बडगुजर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच आता शिवसेनेने (ठाकरे) बडगुजर यांच्याविरोधात कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने (ठाकरे) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. नाशिक शिवसेनेची (ठाकरे) नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून स्थानिक नेत्यांनी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सांगितलं.

बडगुजर यांच्या हकालपट्टीचं कारण काय?

नाशिक शिवसेनेने (ठाकरे) सांगितलं की “नुकताच शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा आमच्या संपर्कप्रमुखांना, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला होता. यावेळी राऊत यांनी आम्हाला सांगितलं की सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन कारवाया केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेत सर्व निर्णय हे आमचे पक्षप्रमुख व पक्षाचे नेते घेत असतात. बडगुजर यांच्याबद्दल शिवसेना नेते राऊत यांनी निर्णय घेतला आहे. आमच्याकडे आदेश चालतो. त्या आदेशानुसार आता बडगुजर शिवसेनेचा भाग नाहीत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल म्हणाले, “सुधाकर बडगुजर यांची अलीकडची दोन-तीन वक्तव्ये ऐकल्यानंतर संजय राऊत त्यांच्यावर नाराज झाले होते. तसेच त्यांच्या हालचालींवरही राऊत यांना संशय होता. त्यामुळेच बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. काल गिरीश महाजन शिवसेनेवर अर्वाच्च भाषेत टीका करत होते. त्यावेळी बडगुजर महाजन यांच्या शेजारीच उभे होते. बडगुजर यांनी महाजन यांना विरोध करायला हवा होता. मात्र, बडगुजर यांनी तसं केलं नाही. त्यामुळेच पक्ष त्यांच्यावर नाराज आहे”.