नाशिक – आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’  या महत्त्वाच्या पोलीस सेवेचा आजपर्यंत अनेकांना उपयोग झाला आहे.  संकटकाळात पोलिसांकडून मदत झाल्याची प्रतिक्रिया अनेक जण देतात. गुरुवारी कर्तव्यावर असताना नांदगाव येथे पोलीस अंमलदारांना अनिल थेटे या व्यक्तीच्या मोबाईलवरून वारंवार संपर्क साधण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. ‘डायल ११२’ च्या एमडीटी (मोबाईल डाटा टर्मिनल) वरून आलेल्या संदेशात संबंधिताने मांडवड ( ता.नांदगाव ) गावात २० वर्षांपासून दारू विक्री सुरू असून पोलिसांनी मला मदत न केल्यास मी आत्महत्या करेन ‘ अशी धमकीच दिली…

या धमकीनंतर पोलीस यंत्रणेने स्थानिक पोलीस पाटलांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले. पोलीसही मांडवड गावच्या दिशेने रवाना झाले..पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वारंवार मोबाईलवर संपर्क साधणाऱ्या अनिल थेटे यांना गाठत कुठे दारूचा व्यवसाय सुरू आहे, याबाबत विचारणा केली..यावर थेटे याने पोलिसांना उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली. तेथून पळ काढू लागला.  पोलिसांना थेटे हाच दारूच्या नशेत दिसून आला. कोणताही ठोस अपघात किंवा मदतीची गरज नसतानाही, जाणीवपूर्वक पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने ‘डायल ११२’ चा त्याने गैरवापर केल्याचे उघड झाले.. या व्यक्तीने शासकीय कामात अडथळा आणून आणि आपत्कालीन सेवेची दिशाभूल करून तिचा दुरुपयोग केल्याने त्याच्यावर पोलीस शिपाई रवींद्र पवार यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत गुन्हा दाखल केला.

 वारंवार खोटे ‘ कॉल ‘ करून आणि पोलिसांना त्रास देऊन त्यांचा वेळ वाया घालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास  हवालदार नंदू चव्हाण करीत आहेत.’डायल ११२’ ही नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास सज्ज असलेली महत्त्वपूर्ण प्रणाली आहे..अशाप्रकारे खोटे कॉल करून या सेवेचा आणि पोलिसांच्या वेळेचा दुरुपयोग करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.या घटनेमुळे, गरजूंना तातडीने मिळणाऱ्या मदतीत अडथळा निर्माण होतो. अशाप्रकारे पोलिसांची फसवणूक करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. खरोखर गरज असल्यावरच डायल ११२ प्रणालीचा उपयोग करणे आवश्यक आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, केवळ खऱ्या आपत्कालीन परिस्थितीतच ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.