नाशिक – पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या योजनेस केंद्र सरकारने नकार दिला असताना महाराष्ट्र सरकारची वेगळी भूमिका आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये याविषयी विसंवाद असणे ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील नोकऱ्या इतर राज्यात गेल्या, तसे महाराष्ट्राचे पाणी घालवू नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार सुळे या सोमवारी नाशिक शहरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडले. गृहमंत्र्यांना आपल्या नागपूरमध्ये काय घडतेय त्याची माहिती नसते, असा टोला त्यांनी हाणला. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना धमक्या दिल्याशिवाय काही करता येत नाही. आम्हाला मतदान न केल्यास योजना बंद होईल, अशा धमक्या ते मतदारांना देत आहेत. एकतर महायुतीचे सरकार येणार नाही आणि लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही. आम्ही त्यात सुधारणा करू, असे सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नाशिक: रक्षाबंधनसाठी सुट्टीच्या दिवशीही टपाल कर्मचारी कामावर
निवडणूक लांबणीवर टाकणे हास्यास्पद
पुरेसे सुरक्षा दल उपलब्ध नसल्याचे कारण देत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकणे हास्यास्पद असून ही पळवाट, रडीचा डाव आहे. लोकसभा निवडणुकीआधी बहीण लाडकी नव्हती. निकालानंतर ती लाडकी झाली. लाडकी बहीण योजनेशिवाय हे विधानसभेत उत्तीर्ण होऊ शकत नसतील तर, महायुती सरकारचे हेच अपयश आहे. कितीही निवडणूक पुढे ढकलली तरी निकाल बदलणार नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
फडणवीस यांना चर्चेचे आव्हान
लाडकी बहीण योजनेत विरोधक चुकीचे अर्ज भरत असल्याचा आरोप करणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशी करावी. सरकारची संगणकीय आज्ञावली काय करत आहे, असा प्रश्न करुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुठेही चर्चेसाठी यावे, असे आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.