नाशिक : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या येथील प्रकल्पात शुक्रवारी तेजस एमके – १एची तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हा पेच कित्येक महिन्यांपासून सुटलेला नाही. तो लवकर सुटण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत एचएएलमधील सोहळ्यात गिरीश महाजन हे अचानक पालकमंत्री झाल्याचे पहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी या प्रकल्पात निर्मिलेल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केले. तेजसबरोबर एचटीटी – ४० हे प्रशिक्षणार्थी आणि सुखोई – ३० एमकेआय या विमानांच्या कसरती झाल्या. जवळपास १५ मिनिटांच्या हवाई कसरतीेंनी लढाऊ विमानांच्या युद्धात्मक कारवाईचे दर्शन घडले. त्यानंतर मुख्य सभागृहात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे प्रमुख डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार यांचे आगमन झाले. यावेळी आयोजक एचएएलच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात केवळ एचएएलचे प्रमुख, संरक्षण उत्पादनचे सचिव आणि संरक्षणमंत्री यांचीच भाषणे झाली.
जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. परंतु, आयोजक एचएएलने मंत्री महाजन यांचा नाशिकचे पालकमंत्री म्हणून उल्लेख करीत त्यांचा सत्कार केला. लढाऊ विमानांच्या निर्मितीत गुंतलेल्या एचएएल व्यवस्थापनाला स्थानिक राजकारणाची कल्पना नसावी. त्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाल्याची कुजबूज उपस्थितांमध्ये सुरू झाली. परंतु, एचएएलने जी चूक केली, ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्री महाजन यांचा नामोल्लेख करताना केली नाही.
तेजस एमके-१ ए विमानाच्या कार्यक्रमात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय अशा प्रकारे समोर येईल, याची खुद्द मंत्री महाजन यांनाही कल्पना नव्हती. आयोजकांनी पालकमंत्री म्हणूनच त्यांचे आदरातिथ्य केले, सत्कार केला. व्यासपीठावर ऐनवेळी ते काही सांगू शकले नसावेत. निवेदकाकडून वारंवार पालकमंत्री असाच महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला गेल्याने टळटळीत उन्हातील कार्यक्रमात त्यांनाही सुखद धक्के बसले असावेत. महायुतीतील अंतर्गत वादात पालकमंत्रिपदी महाजन यांची घोषणा होऊनही नंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. मित्रपक्ष माघार घेत नसल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय सुटण्याची शक्यता धुसर बनली आहे. त्यामुळे मध्यंतरी कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची संपूर्ण सूत्रे एकप्रकारे महाजन यांच्याकडे सोपविली. ही जबाबदारी मिळताच त्यांनी स्थानिक प्रशासनावर आपली पकड मजबूत केली. नाशिकचे प्रश्न सोडविण्यासाठी ते वारंवार पुढाकार घेतात, तोडगा काढतात. या बाबतीत त्यांनी पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेतील छगन भुजबळ आणि दादा भुसे यांनाही कधीच मागे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.