जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या  महामार्गासाठी संपादित शेत जमिनींचा योग्य मोबदला देण्यात यावा म्हणून मंगळवारी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.

इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी दीड वर्षांपूर्वीच संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना अजुनही मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर वर्षभरापूर्वीही आक्रोश मोर्चा काढून महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला होता. याशिवाय, फेब्रुवारीत शेतकरी व लोकप्रतिनिधींनी सर्वपक्षीय आंदोलन करून महामार्गाचे काम बंद पाडले होते. विशेष म्हणजे त्या आंदोलनात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे हे दोघे सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या रविवारी सुद्धा शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करत सदरचे आंदोलन थांबविले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी मंगळवारी पुन्हा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरनाड फाट्यावर सुरू असलेले महामार्गाचे काम बंद पाडले. प्रातांधिकाऱ्यांनी कोणाचे काही एक ऐकून न घेता महामार्गाचे काम थांबणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आमदार पाटील आणि त्यांच्या सोबतचे शेतकरी संतप्त झाले. सर्वांनी महामार्गावर काही वेळ रास्तारोको आंदोलन करत घोषणाबाजी केली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी विनंती करुनही आंदोलक मागे हटले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचे पाऊल उचलले. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे. जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे मी आंदोलन करणार. मग सरकार माझे असो की दुसरे कोणाचे. आज २५० शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, त्यांच्या जमिनी मातीमोल भावाने सरकार जबरदस्तीने ताब्यात घेत आहे. पैसे न देता जमिनी ताब्यात घेऊन महामार्गाचे कामही केले जात आहे. आंदोलन करणे हा माझा स्थायी भाव आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.