नाशिक : शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना वेगवेगळ्या समाजविघातक कृती करत समाजकंटकाकडून पोलिसांना आव्हान देण्यात येत आहे. पोलिसांची भीती नसल्याने एका आरोपीने पोलीस ठाण्याच्या आवारातून धूम ठोकली. या संशयितास पकडण्यासाठी मग पोलिसांना कसोशीने प्रयत्न करावे लागले. या आरोपीला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कसारा घाटातील जंगलातून पुन्हा ताब्यात घेतले.

व्दारका परिसरातील काठे गल्ली येथे अमोल हिरवे याच्यावर काही जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शोध पथकाने क्रिश शिंदे (१९, रा. नानावली) आणि त्याचा विधीसंघर्षित जोडीदार यांना सोमवारी ताब्यात घेतले. क्रिशला पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी कोठडीबाहेर काढण्यात आले असता त्याने पोलिसांच्या हाताला झटका देत भद्रकाली पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. यावेळी त्याचा साथीदार पोलीस ठाण्यापासून ठराविक अंतरावर दुचाकीवर त्याची वाट पाहत होता. दुचाकीवर बसत क्रिश फरार झाला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला.

दरम्यान, या नामुष्कीनंतर फरार क्रिश आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र यांना शोधण्याचे आव्हान भद्रकाली पोलिसांसमोर होते. परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी करत क्रिशला मदत करणारा किरण परदेशी (रा. कथडा) याला शोधून काढत त्याच्याकडे क्रिशची चौकशी केली. क्रिश याला रात्री पंचवटीतील निलगिरी बाग शिवारात सोडल्याचे किरणने सांगितले. त्यानंतर तो कोठे गेला, हे माहिती नसल्याचे त्याने सांगितले. मानवी कौशल्य तसेच तांत्रिक पध्दतीचा अवलंब करत सहायक निरीक्षक सत्यवान पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ तासाच्या आत क्रिश याला इगतपुरीजवळ कसारा घाटातील जंगल परिसरातून ताब्यात घेतले.

काही प्रश्न अनुत्तरीत

क्रिश हा भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात असतांना त्याला न्यायालयात हजर करण्याच्या वेळी त्याचा मित्र पोलीस ठाण्याबाहेर दुचाकी घेऊन उभा होता. हा योगायोग की, याविषयी कोणी संबंधिताला माहिती दिली, निलगिरी शिवारात सोडल्यानंतर इगतपुरीपर्यंत क्रिश कसा पोहचला, यासह काही अनुत्तरीत प्रश्नांवर भद्रकाली पोलीस काम करत आहेत