नाशिक : वीज ग्राहकांची कुठलीही परवानगी न घेता खासगी कंपनीचे लोक स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यासाठी दादागिरी करीत असून ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित थांबविण्याची मागणी प्रागतिक पक्ष आणि जनसंघटना संयुक्त समितीने महावितरणकडे केली आहे. सक्तीने हे मीटर लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास प्रखर विरोध करीत आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीे दिला आहे.

स्मार्ट टीओडी वीज मीटरच्या मुद्यावर प्रागतिक पक्ष व जनसंघटना संयुक्त समितीचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, शरद दातीर, राहुल गायकवाड आदींनी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांची भेट घेतली. महावितरणने खासगी ठेकेदारामार्फत जबरदस्तीने व मनमानी पद्धतीने स्मार्ट टीओडी मीटर जोडणी सुरू केल्याचा आरोप केला. वीज अधिनियमानुसार कोणत्याही कंपनीचे मीटर वापरायचे याचे अधिकार ग्राहकांचे असून त्या मीटरची तपासणी करून ते बसविण्याचे कार्य पुरवठादार कंपनीला करायचे आहे. तथापि, महावितरण कंपनी, खासगी ठेकेदार अघोषित सक्ती करून स्मार्ट टीओडी मीटर बसवत आहे. यामुळे ग्राहकांच्या मूलभूत व कायदेशीर हक्कांचे उल्लंघन होत आहे.

स्मार्ट टीओडी मीटरनुसार दिवसा व रात्री तसेच सकाळ, दुपार, संध्याकाळ असे विविध प्रकारचे वीज दर आकारले जात आहे. ज्यात संध्याकाळी महत्वाच्या वेळी चढ्या दराने तर दुपारी सवलतीत वीज दर आकारले जातात. मुळात कंपनी वीज खरेदी करताना वार्षिक वा त्याहून अधिक काळाचा करार करते. त्यामुळे असे वेगवेगळे दर आकारणे हीच ग्राहकांची लूट असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली.

महावितरणचे अधिकारी, खासगी ठेकेदार स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांची परवानगी घेऊन बसविले जात असल्याचा दावा सपशेल खोटा असल्याचे समितीने म्हटले आहे. हे कृत्य शिक्षेस पात्र असून यामुळे अधिकाऱ्यांना सहा महिने कारावासही होऊ शकतो. या प्रकारे नागरिकांना कायदेशीर गुन्हे नोंदता येतील, असे त्यांनी सूचित केले. स्मार्ट टीओडी मीटर सीमकार्डच्या माध्यमातून स्वयंचलीत व संगणकीय प्रणालीवर आधारीत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण करून वीज वापर वाढवणे वा कमी करणे शक्य असल्याची साशंकता निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

महावितरणचे अधिकारी व खासगी ठेकेदार कंपनी यांच्याकडे वीज मीटर बदलण्याविषयी शासकीय किंवा महावितरण कंपनीचे आदेश, सूचना, कार्यालयीन टिपण्णी याची मागणी केली असता त्यांच्याकडे अधिकृत असे कुठलेही कागदपत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे सरकारी खर्चातून खासगी कंपनीला आर्थिक फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी दिसत असल्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. खासगी कंपनीचे लोक आज स्मार्ट टीओडी मीटर न बसविल्यास भविष्यात या मीटरचे पैसे द्यावे लागतील. ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित केला जाईल. ग्राहकांना अंधारात रहावे लागेल, अशी दमदाटी करतात. असे विविध आक्षेपार्ह मुद्दे मांडून स्मार्ट टीओडी मीटरला विरोध करीत जुने मीटर कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली.

स्मार्ट टीओडी मीटर मोफत

महावितरणने स्मार्ट टीओडी मीटर मोफत लावले जात असल्याचे आधीच जाहीर केले आहे. नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटरही मोफत लावण्यात येत आहे. टीओडी आणि नेट मीटर लावताना नियुक्त संस्था वा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क करावा, तक्रार करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.