नाशिक: रेल्वेत चढत असताना महिलेच्या पर्समधील सुमारे चार लाख रुपयांचे सोने व रोकड चोरणाऱ्यास अटक करुन सोनाराच्या ताब्यातून हा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रिया नेवे (रा. साईनगर) यांनी तक्रार दिली. प्रिया या तपोवन एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील दोन लाख ३५ हजार रुपयांच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दिड लाखाचा सोन्याचा चपलाहार, सोन्याचे दागिने आणि रोख १३ हजार रुपये असा एकूण तीन लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शोध पथकातील सहायक उपनिरीक्षक संतोष उफाडे, दीपक निकम, हवालदार शैलेश पाटील आणि रेल्वे पोलीस दलाचे सहायक निरीक्षक दिनेश यादव, आरक्षक मनीष वर्मा, दीपक सानप यांनी संशयित साहिल शेख (२०, रा. धारणगाव, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज संगीता पगारे (रा. धनगर वाडा, श्रीरामपूर) हिच्याकडे ठेवल्याचे सांगितले. संगीताकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने मुद्देमाल सराफ व्यावसायिक बाळासाहेब डहाळे (रा. श्रीरामपूर) यांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सराफाकडून चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची ६.५ तोळे वजनाची लगड हस्तगत केली.