जळगाव : जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये यंदा मूर्तींच्या उंचीपासून सजावटीपर्यंत मोठी चढाओढ पाहायला मिळाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच ३५ फुटाची मूर्ती चोपडा शहरातील ठरली आहे. श्री साई ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे ही मूर्ती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीची उंची साधण्यासाठी चक्क हायड्रोलीक सिस्टीमचा वापर केला आहे.
यंदाचा गणेशोत्सव अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून, तो सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसल्याने विविध गणेश मंडळांमध्ये सर्वात उंच मूर्ती साकारण्याची चुरस दिसून आली आहे. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमूर्ती चोपडा शहरातील ठरली आहे.
जळगाव, भुसावळ, धुळे आणि नंदुरबार यासारख्या मोठ्या शहरांना मागे टाकत चोपड्याने हा मान पटकावला असून, स्थानिकांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला आहे. चोपडा शहरात यावल रस्त्यावरील श्री साई ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे गेल्या १६ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा १७ वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या या मंडळाने यंदाही साई आराध्य गणेशोत्सव साजरा करत असताना, सुमारे ३५ फूट उंचीची मूर्ती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सर्वदुर चर्चेचा विषय ठरलेल्या चोपड्यातील राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अगदी पहिल्या दिवसापासूनच गर्दी होत आहे. श्री साई ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुणाल जगताप तसेच सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन ३५ फूट उंच मूर्ती साकारून चोपडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सदरची मूर्ती बऱ्हाणपूर येथील गायत्री आर्टमधून तयार करण्यात आली आहे. तर मूर्तीची पार्श्वभूमी मुंबईतील परेलच्या वर्कशॉपकडून बनवून घेतली आहे. सर्वच बाबतीत खास ठरलेल्या या मूर्तीची उंची साध्य करण्यासाठी हायड्रोलीक सिस्टीम वापरण्यात आली आहे.
चोपड्यात पाचव्या दिवशी विसर्जन
दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दहाव्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, चोपडा तालुका त्यास नेहमीच अपवाद ठरला आहे. या तालुक्यातील लहान-मोठी सर्व मंडळे स्थापनेनंतर पाचव्या दिवशीच गणेश मूर्तींचे विसर्जन करतात. त्यानुसार, यंदाही रविवारी पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची परंपरा जोपासली जाणार आहे. चोपडा तालुक्यात यावर्षी एकूण ११५ मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली असून, त्यापैकी ६८ मंडळे शहरी भागात तसेच ४३ मंडळे ग्रामीण भागात आहेत. मोठी गणेश मंडळे शक्यतो तापीसह इतर नद्यांवर मूर्ती विसर्जन करण्यास पसंती देत असली, तरी लहान मंडळांसाठी नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कृत्रीम तलाव तयार करण्यात येणार आहे.
एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात गणेश विसर्जन होणार असल्याने कायदा सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी २५० पोलीस, १२० गृह रक्षक दलाचे जवान आणि १२ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.