महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने शिवसेनेच्या तटबंदीला धक्का दिल्याने हादरलेल्या पदाधिकाऱ्यांनी संभाव्य पडझड रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी नाशिकरोड विभागातील माजी सेना नगरसेवकांच्या घरोघरी भेटी घेऊन त्यांनी चर्चा केली. गुरूवारी सिडको आणि सातपूर विभागातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शुक्रवारी पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबईच्या वारीतून सेनेशी एकनिष्ठ आणि शिंदे गटात जाणारे संभाव्य फुटीर यांची स्पष्टता होणार आहे.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये पावणेतीन लाखांचा किटकनाशकांचा साठा जप्त

सेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात सहभागी होत स्थानिक राजकारणात फाटाफुटीचा श्रीगणेशा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने फासे टाकण्यास सुरूवात केल्याने सेनेच्या वर्तुळात अस्वस्थता आहे. अनेक नाराज माजी नगरसेवक पक्षांतर करणार असल्याचे दावे शिंदे गटाकडून होऊ लागल्याने त्यांना पक्षातच थांबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना धडपड करावी लागत आहे. तिदमे बंडखोरी करतील, याचा कुणाला अंदाज आला नाही. त्यांच्यापाठोपाठ इतर कुणी शिंदे गटात जाऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यानी माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधण्यास सुरूवात केली. सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापौर वसंत गिते, सुनील बागूल, माजी गटनेते विलास शिंदे यांनी नाशिकरोडमधील प्रशांत दिवे, श्याम खोले, सूर्यकांत लवटे, मंगला आढाव, कन्नू ताजणे, आर. डी. धोंगडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रत्येकाशी सविस्तर चर्चा केली. संध्याकाळी अन्य नगरसेवकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. शिवसेनेचे विभागनिहाय आणि प्रभागनिहाय मेळावा घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.

हेही वाचा >>> नाशिक : कांद्याची घसरण रोखण्यासाठी उपायांची गरज – छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तिदमे यांच्या पाठोपाठ शिंदे गटात अन्य कोणी नगरसेवकांनी जाऊ नये, याकरिता पदाधिकारी संवादातून चाचपणी करीत आहेत. सिडको आणि सातपूर विभागातील माजी नगरसेवक आणि महानगरातील पदाधिकारी यांची बैठक गुरूवारी सकाळी १० वाजता सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे बोलाविण्यात आली आहे. संभाव्य फुटीरांची स्पष्टता होण्यासाठी शुक्रवारी निष्ठावंतांना मातोश्रीवर नेण्यात येणार आहे. पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतील. मुंबई वारीत सहभागी न होणारे नगरसेवक आणि पदाधिकारी संभाव्य फुटीरांमध्ये गणले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचा एक माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. नाशिकरोड विभागातील पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यात आली. सर्व नगरसेवक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे आहेत. गुरूवारी सिडको आणि सातपूर विभागातील नगरसेवकांची बैठक होत आहे. शुक्रवारी पक्षाच्या सर्व माजी नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात येणार आहे. यात किती जण सहभागी होतात, त्यावरून सर्व स्पष्टता होईल.- सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, शिवसेना)