नाशिक – शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शरद पवार हे खुल्या वाहनातून सहभागी झाले होते. त्यांच्या वाहनावर कांद्याचे ढीग ठेवण्यात आले होते. आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आणि मागण्यांचे फलक हाती घेतले होते. शेतकऱ्यांनी टोपलीत शेतमाल आणला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

शहरातील ईदगाह मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या बैलगाडीवर चढल्या. बैलगाडी त्र्यंबक नाकापर्यंत आल्यावर त्या बैलगाडीवरून खाली उतरल्या. तेथून पुढे शरद पवार हे खुल्या वाहनात बसून मोर्चात सहभागी झाले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, आ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, खा. भास्कर भगरे, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष गजानन शेलार आदी सहभागी झाले होते. शरद पवार यांच्या वाहनावर कांद्यांचे ढीग ठेवण्यात आले होते. मोर्चात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या.

आदिवासी बांधवांनी आपल्या कडील भाजीच्या टोपल्यांमध्ये रानभाज्या, धान तसेच इतर धान्य ठेवत आमच्या शेतीमालाला हमीभाव द्या, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी आम्ही शेतकरी, आम्ही शरद पवार समर्थक अशा पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. हा मोर्चा जसजसा पुढे गेला, तशी गर्दी वाढत गेली. तुतारी आणि आदिवासींच्या वाद्यांची मोर्चाला साथ मिळाली.

दरम्यान, मोर्चात शेतकऱ्यांचा आवाज जो दाबणार त्याला धडा शिकवणार, तब लढे गोरोंसे अब लढेंगे चोरोंसे, व्होट चोरी, आमच्या पिकाला हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासह अन्य मागण्यांचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. मोर्चामुळे सीबीएसपासून अशोक स्तंभपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता., मोर्चामुळे अशोकस्तंभ, शालीमार, जिल्हा परिषद मार्ग, जिल्हा रुग्णालय आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाने केलेले नियोजन कोलमडले. मोर्चा संपल्यानंतर वाहतुक नियंत्रणात येण्यास अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला.