नाशिक – महाराष्ट्राला गुजरातशी जोडणाऱ्या नाशिक-पेठ-धरमपूर या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, अपघात व यात होणारे मृत्यू टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करण्याची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महामार्गावरील घाट दुरुस्तीच्या कामांसाठी वाहतूक तीन महिने बंद राहील. या काळात पर्यायी मार्गावर वाहतूक वळवणे, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, या कामात अडथळे आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या महामार्गावरील सावळघाट व कोटंबी घाटाची ग्रामस्थ व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना प्रतिबंधक उपाय योजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सावळघाट व कोटंबी घाटामधील काम पुढील १५ दिवसांत सुरू करावे. घाटातील हे काम तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाने लवकर करावी. वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य फलक लावण्याची कार्यवाही उभयतांनी समन्वयातून करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सावळ्या पोवळ्या (जुना ब्रिटीशकालीन) रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले. सावळ घाट व कोटंबी घाटात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तत्काळ नियुक्त करावे. नाशिक बाजार समितीतून दररोज वाहने कृषिमाल घेऊन गुजरातला जातात. या काळात ही वाहने या काळात सापुतारा मार्गाने गुजरातला जातील. या राष्ट्रीय महामार्ग पुढील तीन महिने घाट दुरूस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्याचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरटीओ यांना कळविण्यात येणार आहे.
सावळघाट व कोटंबी घाटात अवजड वाहनांची नादुरूस्ती वा अपघात होतात. अशावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनची मदत लागते. यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ एक क्रेन उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली. सावळ्या पोवळ्या (जुना ब्रिटीशकालीन) रस्त्याबाबत शेतकऱ्यांची आठ दिवसांत बैठक घेऊन रस्त्याच्या कामाला सुरूवात करावी, यात शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, अस इशाराही देण्यात आला आहे.
पेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयांनी गरोदर मातांची प्रसुती काळजीपूर्वक होईल, याबाबत काळजी घ्यावी. तसेच क्षेत्रीय स्तरावर पुढील तीन महिन्यांत प्रसुती होणाऱ्या महिलांची स्वतंत्र नोंदणी करण्याची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी, पेठ यांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या आहेत. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विनाकारण रूग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवल्यास संबंधितांवर वरिष्ठांनी शिस्तभंगाची कारवाई करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.