मनमाड: शहरातील इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक प्रशासनाने बंद केली असून त्यामुळे सर्वदूर वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रामुख्याने रेल्वे जंक्शनमुळे मनमाड येथून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली आहे. स्थानिकांचा नेहमीच्या कामासाठी संपर्कही खंडित झाला आहे. प्रामुख्याने रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांत आणण्यासाठी कॅम्प येथून गावात येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे.
इंदूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गावर मनमाड बस स्थानक हे मध्यवर्ती आणि जंक्शन स्थानक आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातून रेल्वेने मनमाड येथे येऊन येथून शिर्डी, अजिंठा, वेरूळ, शनिशिंगणापूर येथे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून नगर आणि पुण्यासाठी मनमाडमार्गेच बस किंवा खासगी वाहनाने जाणार्या प्रवाशांची मनमाड बस स्थानकात नेहमीच गर्दी असते. पण बुधवारच्या दुर्घटनेमुळे नगर, पुणे येथे जाण्यासाठी मनमाडचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘द्राविडी प्राणायाम’ करत लांबच्या मार्गाने म्हणजे नांदगाव किंवा लासलगावमार्गे येवला-नगर-शिर्डी-पुणे असे जावे लागत आहे. नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, अमळनेर, धुळे व मालेगाव येथून मनमाडमार्गे पुण्याला जाणाऱ्या सर्व बस सध्या नांदगावमार्गे जात आहेत. म्हणजे वाहतूक वळवल्याने मनमाडला जाणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
हेही वाचा… नाशिक शहरावरील पाणी कपात तुर्तास लांबणीवर
अपघातग्रस्त मार्ग आणि रस्ता लोखंडी जाळ्यांनी बंद करण्यात आल्याने खासगी वाहनांना चांदवडमार्गे जावे लागते. तर पुणे, सोलापूर, नगरकडे जाणाऱ्या बससाठी नांदगावहून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. परतीचा प्रवास याच मार्गाने राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भूर्दंड सोसावा लागत आहे. बाहेरच्या बससेवेचा मनमाडला जा-ये करणाऱ्या प्रवाशांना फायदा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय मनमाड हे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे प्रवासासाठी मनमाडला जाणार्या प्रवाशांची संख्या उत्तर महाराष्ट्रातून सर्वाधिक आहे. या प्रवाशांची देखील मोठी गैरसोय होत आहे. पूल खचल्याने पलीकडे असलेल्या कॅम्पसह मोठ्या नागरी वस्तीचा मनमाड शहराशी संपर्क तुटला. त्यांना वाहनाद्वारे लांबचा पल्ला पार करून शहरात यावे लागते. यात रुग्ण, शालेय विद्यार्थी आणि बाजारपेठेत येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.