नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटात अपघातग्रस्त झालेला एलपीजी गॅस टँकर आणि उलटलेला अवजड ट्रेलर अथक प्रयत्नांती बुधवारी दुपारी बाजुला हटविण्यात यश आले. सुमारे ४२ तासांनंतर महामार्गावरील चांदवड-मालेगाव दरम्यानची विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली.

चांदवडजवळील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री एलपीजी गॅस टँकरला विचित्र अपघात झाला होता. रविवारी या घाटात ट्रेलरचा अपघात होऊन उलटला होता. अवजड ट्रेलर हटविण्यासाठी क्रेन मागविण्यात आली होती. रात्री ट्रेलर हटविण्याचे काम सुरू असताना गॅस टँकर त्यावर धडकला. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद केली. अपघातात चालक कृष्णा चौबे (५०) यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी दिवसभर गॅस गळती रोखण्यासाठी बीपीसीएल कंपनीच्या पथकाचे प्रयत्न सुरू होते. टँकरमध्ये १८ हजार किलो गॅस असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घ्यावी लागली. टँकरमधील काही गॅस दुसऱ्या रिक्त टँकरमध्ये टप्प्याटप्प्याने भरावा लागला. उर्वरित बराचसा गॅस हवेत सोडून देणे भाग पडले.

अपघातानंतर महामार्गावरील चांदवड-मालेगाव या मार्गावरील वाहतूक चांदवड-मनमाड-मालेगाव अशी तर मालेगाव-चांदवड दरम्यानची वाहतूक मालेगाव-मनमाड-चांदवड आणि मालेगाव-देवळा-सोग्रस फाटा अशी वळविण्यात आली होती. वाहनधारकांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत होते. अपघातग्रस्त टँकर, उलटलेला ट्रेलर आणि क्रेन हटविण्यासाठी शक्तिशाली क्रेन घटनास्थळी मागविण्यात आल्या.

बुधवारी सकाळपासून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजुला नेण्याचे काम सुरू झाले. दुपारी तीन वाजता ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

राहुड घाटात वाढते अपघात

महामार्गावर नाशिक-धुळे दरम्यान चांदवड तालुक्यात राहुड घाट आहे. तीव्र उताराच्या वळणदार रस्त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. काही महिन्यांपूर्वी उताराच्या रस्त्यावर ब्रेक निकामी होऊन मालमोटारीने तीन वाहनांना उडवले होते. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, २० जण जखमी झाले होते. यावेळी घाटात रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस अपघात झाले. यातील एक अवजड ट्रेलर आणि दुसरा एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरचा होता. हा टँकर अपघातग्रस्त ट्रेलर व क्रेनवर जाऊन धडकला. यामुळे जवळपास पावणेदोन दिवस महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.